Saturday, August 15, 2015

महायोगी श्रीअरविंदांच्या जयंतीनिमित्त नि स्वातंत्र्यदिनानिमित्त आपणा सर्वांचे हार्दिक अभीष्टचिंतन !!!


महायोगी श्री अरविॅद ! आज जसा हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन तसाच अरविंदांचा जन्मदिवसही ! त्यांची १४३वी जयंती ! मागच्या वर्षी याचदिवशी आदरणीय पंतप्रधानांनी जेंव्हा प्रात:काली स्वातंत्र्यदिनाचा संदेश दिला तेंव्हा श्रीअरविंदांचा उल्लेख केला होता. श्रीअरविंद हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील एक महान तत्वज्ञ, महायोगी, कट्टर क्रांतिकारक, वेदांवरचे भाष्यकार, विद्वान, महाकवी, इतिहासकार, भाषाप्रभु, अखंड हिंदुराष्ट्राचे कट्टर समर्थक आणि आणखीही अनेकविध गुणांनी नटलेले एक व्यक्तिमत्व !
काही महिन्यापूर्वी आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी फ्रांसमधल्या दौर्यात अरविंदांच्या पुतळ्यास प्रणाम केला. काय विलक्षण गोष्ट आहे पहा ! मोदी आहेत म्हणून खरंतर हे होतंय ! नाहीतर आपल्या देशात तसेही बरेच जण कोण हे महायोगी अरविंद म्हणून विचारतील आताही नि उद्या भविष्यातही. फ्रांसमध्ये महायोगी अरविंदांचा पुतळा आहे पण आमच्या भारतामध्ये अरविंद माहितीच नाहीत फारसे लोकांना ! किती दुर्दैव म्हणायचं ! ह्याचं उत्तर स्वत: विवेकानंदांनी पण दिलं होतेच म्हणा
" मुलाला शाळेत घातले जाते. तो प्रथम हे शिकतो की आपले वडील हे मुर्ख आहेत, दुसरें म्हणजे आपले आजोबा वेडे आहेत, तिसरे असें की आपले सर्व प्राचीन आचार्य ढोंगी होते, आणि चवथी गोष्ट म्हणजे आपले सर्व धर्मग्रंथ खोटारडे आहेत ! याचा परिणाम असा की पन्नास वर्षाच्या यां शिक्षणांतून, या तींन प्रांतातून मौलिक विचार करणारी एकही व्यक्ती निर्माण होऊं शकली नाही."
ही आहे त्यावेळची परिस्थिती ! आजही काही परिवर्तन झालंय का??? नाहीच नाही ! शालेय अभ्यासक्रमातून श्रीशिवछत्रपती, श्रीअरविंद, श्रीविवेकानंद, रामायण-महाभारत शिकवलं जातं का?? नाहीच नाही ! उलट ते सगळं खोटं कसं आहे हेच ठरविण्याचे प्रयत्न चालतात. आता आपण श्रीअरविंदांच्या चरित्राकडे वळु.
महायोगी श्रीअरविंद चरित्रचिंतन
एतद्देशप्रसुतस्य सकाशादग्रजन्मन: !
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवा: !
मनुस्मृती
ज्यांच्या जिव्हाग्रांवर प्रत्यक्ष सरस्वतीच नांदत होती असे महापुरुषांच्या जीवनावरचे भाष्यकार एक प्रबोधनकार असे सरस्वतीपुत्र प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी अरविंदांवर लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथामुळे नि व्याख्यानांमुळे खरंतर महाराष्ट्राला अरविंदांचं चरित्र माहिती झालं. अरविंदांचं व्यक्तिमत्व, चरित्र, साहित्य नि एकंदरीतच सर्व काही इतकं विलक्षण आहे की ते एका लेखात सांगणं अशक्य आहे, केवळ अशक्य ! तरीही एक लहानसा लेखनप्रपंच !

बंगालमधल्या कलकत्ता भागातल्या एम.डीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या डाॅ. कृष्णधन घोष ह्या वैद्यकीय अधिकार्याच्या पोटी १५ आॅगस्ट, १८७२ ह्या दिवशी जन्माला आलेले हे महायोगी अरविंद ! वडिलांनी मुलांना भारतीय संस्कृतीचा गंधही लागु नये म्हणून वयाच्या सातव्या वर्षीच अरविंदांना लंडनला पाठवलं. तिथे एकही भारतीय संस्कार मुलांवर होणार नाही अशी व्यवस्था लावली. हा मुलगा जात्याच विलक्षण बुद्धिमान नि मेधावी असल्याने लहानवयातच त्याने शेक्सपीयर, यीट्स हे तत्त्वज्ञ वाचून काढले नि काही मुखोद्गतही केले. पुढे वडिलांच्या इच्छेसाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याकाळची आयसीएसची (आजची UPSC-IAS) परीक्षाही ते उत्तीर्णही झाले. पण ब्रिटीशांची परदास्यता स्वीकारायची नाही ह्या विचाराने एक अश्वारोहण परिक्षा ही पात्रता परिक्षा होती ती त्यांनी हेतुपुरस्सर दिली नाही म्हणून त्यांचं नाव अधिकार्याच्या यादीत आलंच नाही. केवढा विलक्षण त्याग हा ! सुभाषचंद्र बोसांनीही हाच त्याग केला नव्हता का??? पण आज कोणता IAS-IPS विद्यार्थी हा त्याग करेल???
भारतात आगमन नि स्वातंत्र्यकार्यास प्रारंभ
पुढे कालांतराने अरविंद हिंदुस्थानात परत आल्यांनंतर बडोद्याच्या श्री सयाजीराव गायकवाडांशी त्यांचा संपर्क आला नि त्यांच्या महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्रशासक नि प्राध्यापक पदाचे कार्य केले. याच बडोद्याशी महामानव डाॅ आंबेडकरांचा पण संपर्क आला होता. महाराजांची व्याख्याने लिहिण्याचंही काम केलं. आंग्लभाषेवरचं त्यांचं प्रभूत्व इतकं असामान्य होतं की महाराजांनी एकदा लिहूनच दिलं होतं की तुम्ही लिहिलेलं व्याख्यान इतकं अवघड आहे की लोकांनाकदाचित संशय येईल. "It is too fine to be mine." इथेच त्यांनी हिॅदु संस्कृतीचा नि हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा खोलवर अभ्यास केला.



पुढे बंगालमध्ये परत येऊन स्वातंत्र्यप्राप्तीचं कार्य
श्रीअरविंदांचं बंगालमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी तिथे सुबोध मलिक ह्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल काॅलेज मध्ये अध्यापनाचं काम केलं. एकाएकी श्रीरामकृष्ण परमहंसांचं चरित्र त्यांच्या हाती लागलं नि त्यांच्या मनात एक कुतुहल जागं झालं. त्यांनी प्राणायामाचा अभ्यास सुरु केला नि सहा महिन्यात त्याची परिणिती त्यांना दिसुन आली. त्यांच्या अंगावर डास बसेनासे झाले नि त्वचा अतिशय कांतिमान झाली. कालांतराने विवाहबद्ध होऊन पुढे जाऊन त्यांनी क्रांतिकारकांशी संपर्क साधला. हिंदुराष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ते तळमळत होते. त्यांचे लेख वाचून अनेक तरुण क्रांतिकार्यात उडी घेत. त्यामुळे ब्रिटीशांना अशी भीती वाटायला लागली की आयसीएस झालेला हा माणुस जर ह्या बंगाल्यांचं मार्गदर्शन करायला लागला तर आपलं कसं होणार??? म्हणून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु झाले नि शेवटी अटक झालीच. पुढे ह्याच अटकेतच त्यांची योगसाधना सुरु झाली. नि भगवान श्रीकृष्णाचा नि विवेकानंदांचा साक्षात्कार त्यांना झाला. आणि इथेच त्यांच्या जीवनाला एक विलक्षण अशी दिशा मिळाली. बॅरिस्टर चिंत्तरंजन दासांनी त्यांची बाजु न्यायालयात मांडताना म्हटलं होते की,
"Long after He is dead and gone, He will be looked upon as a Poet of Patriotism, Propthet of Nationalism and a Lover of Humanity."

कारागृहातील श्रीकृष्णसाक्षात्कार नि उत्तरापथ भाषण
अरविंदांना कारागृहात एक योगसाधनेसाठी एक आवाज सतत मार्गदर्शन करत होता. हा आवाज होता विश्वमानव स्वामी विवेकानंदांचा ! भारतीयांची खंडित झालेली यगपरंपरा पुन्हा मंडित करण्याचं कार्य तुला करायचं आहे ह्या स्वामीजींच्या आदेशाने अरविंदांनी ती योगसाधना सुरु केली. आणि पुढे ह्या अलीपुरच्या कारागृहात त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम योगयोगेश्वर भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. काय योगायोग आहे पहा ! एक पाश्चिमात्य संस्कारात वाढलेला एक आयसीएस अधिकारी पुन्हा भारतात येतोज्याला भारतीयत्वाचा काही गंधही नसतो त्याला श्रीमत् स्वामी विवेकानंद आणि योगेश्वर श्रीकृष्णाचं मार्दर्शन मिळतं ही नियतीची योजनाच म्हणायची !
उत्तरापथ भाषण (Uttarapara Speech) - ३० मे, १९०९
श्रीअरविंद जेंव्हा सुटुन कारागृहातून निर्दोष सुटून आले तेंव्हा त्यांनी त्यांच्या स्वागतास उत्तर देताना जगप्रसिद्ध असं एक भाषण दिलं की जे उत्तरापथ भाषण (Uttarapara Speech) नावाने गणलं जातं. ३० मे, १९०९ चं ते भाषण जिज्ञासुंनी अवश्य वाचावं. श्रीअरविंदांच्या विलक्षण अशा आत्मविश्वासाचे नि भविष्यवेधाचे ते एक प्रतिबिंब आहे. भारतावरच्या नि आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मावरच्या त्यांच्या अलौकिक नि असीमित अशा प्रेमाचं, श्रद्धेचं नि त्यागाचं ते एक दर्शन आहे.
योगसाधनेस सुरुवात
"Spirituality is indeed the master key of the India mind, the sense of the infinite is native to it. - Shri Aurobindo"
कारागृहातील श्रीकृष्णाचा नि विवेकानंदांचा साक्षात्कार त्यांना इतका प्रेरणादायी ठरला की गांधीजींच्या "आतल्या आवाजा"प्रमाणे तो पुढे जीवनभर त्यांचं मार्गदर्शन करत राहिला. पुढे त्याच आवाजाच्या उपदेशाने ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पुदुच्चेरी (पाँडेचरी) इथे जाउन राहिले. इथेच त्यांच्या योगसाधनेस सुरुवात झाली. आयुष्यातली पुढची चार दशके ते इथेच कायमचे राहिले. इतिहासात अशी घटना क्वचितच घडली असेल की सुरुवातीला पूर्ण आंग्लाळलेला एक उच्चशिक्षित नि विलक्षण प्रतिभासंपन्न असा तरुण पुढे जाऊन एकाच ठिकाणी राहून इतक्या प्रदीर्घकाळ योगसाधना करतो. इथले सर्व अनुभव त्यांनी आपल्या ग्रंथांत शब्दबद्ध केले आहेत. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

श्रीअरविंदाचे साहित्य नि तत्वज्ञान
श्रीअरविंद हे जसे प्रज्ञावंत होते तसेच ते एक महाकवीही होते. सावित्री नावाची त्यांची कविता ही जगातली सर्वात मोठी कविता आहे. महाकवी कालिदासाची प्रतिभासंपन्नता लाभलेला हा महाकवी इतक्या उत्कटतेने अशा काव्याची निर्मिती करतो काय अन् योगसाधनेच पारंगत होऊन हिंदुस्थानचा इतिहास, वर्तमान नि भविष्य ह्याचा भाष्यकार होतो काय हे खरंच महदाश्चर्य करण्याचे विषय आहेत.
Life Divine हा ग्रंथ नि जीवनविषयक तत्वज्ञान
त्यांचा हा ग्रंथ त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. द्विखंडात्मक असा हा ग्रंथ असुन भाषा अतिशय अवघड नि वाक्ये अतिशय पल्लेदार आहेत. सेनापती बापटांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मी स्वत: तो मुळ इंग्रजी वाचला असला तरी तो माझ्या डोक्यावरून गेला ही गोष्ट अर्थातच वेगळी सांगायला नको.विवेकानंदापेशा अरविॅदांच इंग्रजी हे अतिशय अवघड आहे.
वेदोपनिषदांवरचे भाष्यकार
श्रीअरविंदांची ग्रंथसंपदा ही विलक्षण चिंतनीय नि मननीय नि पठणीय आहे. Secret of the Vedas नि Hymns to the Mystic Fire ह्या दोन ग्रंथांत त्यांनी वेदांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. महाभारत रामायणावरचेही त्यांचे भाष्य उपलब्ध आहे.वेदांत गोहत्या नाहीचनाही हे ठासून सांगणारे ते एक भाष्तार आहेत. सायणाचार्यांपासून ते मॅक्सम्युलरपर्यंत सर्वांच्या लेखनाचा त्यांनी अभ्यासपूर्ण मागोवा घेतलेला असून प्रसंगी टीकाही केलेली आहे. इतकंच नव्हे तर वेदांवरच्या भाष्याबाबत त्यांनी स्वामी दयानंदाचंच भाष्य अधिक सटीप, साधार नि तर्कशुद्ध नि वास्तवाला धरून आहे असं सिद केलं आहे. त्यांच्या Bankim, Tilak and Dayanand ह्या ग्रंथात ते म्हणतात
"Interpretation in detail is a work of intelligence and scholarship and in matters of intelligent opinion and scholarship men seem likely to differ to the end of the chapter, but in all the basic principles, in those great and fundamental decisions where the eye of intuition has to aid the workings of the intellect, Dayananda stands justified by the substance of Veda itself, by logic and reason and by our growing knowledge of the past of mankind.
In the matter of Vedic interpretation I am convinced that whatever may be the final complete interpretation, Dayananda will be honoured as the first discoverer of the right clues. Amidst the chaos and obscurity of old ignorance and age-long misun- derstanding his was the eye of direct vision that pierced to the truth and fastened on that which was essential. He has found the keys of the doors that time had closed and rent asunder the seals of the imprisoned fountains."
हिंदुस्थानच्या इतिहासासंदर्भातले त्यांचं चिंतन
हे सर्व The Renaissance in India आणि भारतीय संस्कृतीचा पाया(The Foundation of Indian Culture) ह्यात आलं आहे. त्यांचं राजकीय नि सामजिक चिंतन नि तत्कालीन परिस्थितीवरचे भाष्य हे त्यांनी वंदे मातरम् (Bande Mataram), Early cultural writtings, कर्मयोगिन् (Karmayogin) नि आर्य (Arya) ह्या त्यांच्या मासिकातून वेळोवेळी प्रकट केले आहेत.
श्रीअरविंदांचे सिद्धांत
आर्य हे मुळचे भारतीयच असे सांगणार्यांपैकी एक म्हणजे श्रीअरविंद. वेदांमध्ये गोहत्या नाही हेदेखील ठामपणे सांगणारे तेच. हिंदुस्थानचा इतिहास हा वैभवशाली नि गौरवशाली असुन जगाच्या तुलनेत तो कित्येत दृष्टीने प्रगत होता हे अभ्यासपूर्ण रीतीने ठासविणारे श्रीअरविंदच ! सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे; जर तो नष्ट झाला तर आपल्या राष्ट्राचाही नाश होईल असा संदेश देणारे श्रीअरविंद !
वेगळेपण त काय ह्या चरित्रात???
आजची तरुणाई भारतात राहूनही परदेशाची स्वप्ने पाहते नि भारत हा कधीही न सुधारणारा देश आहे असा सोयीचा निष्कर्ष काढून दायित्वापालून पलायन करते. पण श्रीअरविंदांचे वेगळेपण हे आहे की वयाच्या ऐन पंचविशीपर्यंत भारतीय संस्कृतीचा गंधही नसणारा एक भारतीय युवक पुढे जाऊन हिंदुधर्माचा कट्टर अनुयायी नि समर्थक होतो, चाळीस वर्ये एकाच जागी राहून तो एक महायोगी होतो, उत्कट असा प्रतिभासंपन्न महाकवी होतो, वेदांवरचा नि इतर धर्मशास्त्रांवरचा भाष्यकार नि भाषाप्रभु होतो, हिॅदुस्थानचा इतिहास, वर्तमान नि भविष्य ह्याचा उत्तम नि तर्कशुद्ध असा विवेचक होतो, समाजसुधारक होतो, जगातल्या सर्वात मोठ्या अशा कवितेचा निर्माता असा महाकवी होतो ! काय सांगायचं आहे का अजुन??? अशा ह्या महायोग्यास विनम्र अभिवादन !!!! 🙏🙏🙏



किती लिहु आणि कसं लिहु??? लिहिलं तेवढं कमी आहे. विस्तारभयास्तव लेखाचा शेवट त्यांच्याच "भवानी भारती" ह्या संस्कृत ग्रंथातल्या शब्दात करतो. भारतमातेबददल ते म्हणतात
न हि सा कश्चित् भूखण्डविशेष:, न वा भाषाया: अलंकार: न वा मनसा कल्पना ! सा खलु महाशक्ति: ! यथा भवानी महिषमर्दिनी बलपुंजरुपेण संहतानाम्, ऐक्यग्रथितानां कोटिश: देवानां शक्तै: आविर्भूता तथैव राष्ट्रस्य अंगभूतानां कोटिश: प्रजानां समवायेन सा निर्मिता: ! यां शक्तिं वयं भारतवर्षं भवानी भारतीं वा मन्यामहे सा हि त्रिशत्कोटिप्रजानां शक्तै: जीवत्समवाय:, किन्तु सा निष्क्रिया, तमस: मोहावर्ते निगडिता, स्वसन्तानानां क्षुद्रस्वार्थरतेन जाड्येन अज्ञानेन च ग्रस्ता ! अन्तस्थ: ब्रह्मण: जागरणम् एव तमस: मुक्ते: उपाय: !
भवानी भारती: - श्रीअरविन्द: !!!!
अरविॅदांबद्दल एकाने म्हटलेलंच आहे
त्वमादिदेवं पुरुष: पुराण: त्वमस्य विश्वस्य परं विधानम् !
वेद्यासि वेद्यं च परं चं धामं त्वया ततं विश्वमनन्तरुपम् !
तुकाराम चिंचणीकर

No comments:

Post a Comment