Wednesday, December 10, 2014

सावरकरांचं सागरसूक्त - ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !



सावरकरांचं सागरसूक्त - ने मजसी ने परत मातृभूमीला !
आज १० डिसेंबर ! १०५ वर्षांपूर्वी म्हणजे १० डिसेंबर, १९०९ साली हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनार्यावर ने मजसी ने परत मातृभूमीला ह्या कवितेची रचना केली. मातृभूच्या विरहार्थ रचलेल्या ह्या अद्वितीय काव्याचं चिंतन हे सावरकरांच्या अत्युत्कट नि प्रखर राष्ट्रभक्तीचं द्योतक आहे ! हिंदुस्थानच्या इतिहासात एवढ्या अलौकिक मातृभूच्या विरहाचं यथार्थ चित्रण अन्यत्र क्वचितच सापडेल ! क्रांतिकारकांचे मुकुटमणी असलेल्या सावरकरांच्या नवनवोन्मेषशालिनी अशा प्रतिभेला फुटलेले हे धुमारे हे सावरकरांच्या प्रतिभासंपन्नतेचे जसे चित्रण करतात, तद्वतच त्यांच्या प्रखर राष्ट्राभिमान नि दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रतीक आहेतच ! ज्या सावरकरांनी पुढे जाऊन अंदमानच्या भयाण अंधेरीत लेखन साहित्य न मिळाले तरीही केवळ खिळ्यांच्या सहाय्याने दहा सहस्त्र आेळींचं महाकाव्य लिहून काढलं, त्या तात्याराव सावरकरांचं हे सागरसूक्त प्रत्येकाच्या चिंतनाचा विषय आहे !
पार्श्वभूमी
अभिनव भारत ह्या आपल्या क्रांतिकारक संघटनेवर ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांची झालेली पकडापकड नि अनन्वित अत्याचार, स्वतःच्या बंधुंची झालेली अटक ह्या सर्व पार्श्वभूमीवर हा द्रष्टा महामानव नक्कीच गहिवरला ! भविष्यात आपणांसही अटक होणार नि आपल्या हातून घडणारे ह्या राष्ट्रकार्याला विराम मिळणार ह्या भावनेने तात्याराव अस्वस्थ झाले. त्यांच्याच शब्दांत सांगितलं तर...
कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेने !
लब्धप्रकाश अितिहास-निसर्गमानें !
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे !
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे !!
हे सतीचं वाण धरल्याने जे काही दिव्य नि दाहक परिणाम भोगायचे ते भोगण्यास ते सिद्ध होतेच, त्यात शंकाच नाही ! पण त्यांची अवस्था अशी होती की लंडनच्या वास्तव्यात त्यांना नि त्यांच्या सहकारयांच्या धरपकडीने ते मातृभूच्या विरहाने अतिशय व्याकुळ झाले होते ! तेंव्हा लंडनपासून ५० मैल दूर असलेल्या ब्रायटनच्या किनार्यावर त्यांना ह्या वेदना असह्य झाल्यावर त्यांच्यातल्या प्रतिभासंपन्न कवीने हे काव्य रचले ! त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे मित्र निरंजन पाल हेदेखील होते!


रसग्रहण
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणिन ॥
विश्वसलो या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
ह्याच सागराला पलाय प्राणप्रिया भारतमातेच्या चरणतलाला धुताना सावरकरांनी पहिले होते. मला तू म्हणालास की आपण परदेशी जाऊ आणि सृष्टीची विविधता पाहू म्हणून. त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली. पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन. लवकरच परत येऊ या तुझ्या वाचनावर मी विश्वास ठेवला आणि फसलो म्हणजे “बनलो.”

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तशी माझी फसगत झाली आहे.
हा भूमातेचा विरह मी कसा सहन करू ? माझ्या पुढच्या दिशा तमोमय म्हणजे अंधःकारमय झाल्या आहेत. त्या भारतमातेने सुगंध घ्यावा म्हणूनच मी हि गुणसुमने वेचली. पण जर माझ्या विद्येच्या विनियोग जर ह्या मातेच्या उद्धारासाठी होत नसेल तर तिचा भार मजला व्यर्थ आहे. ति आम्रवृक्षवत्सलता, त्या नवीन फुलांच्यावेली नि तो बाल गुलाब हे दोन्हीही आज मला पारखे झाले आहेत. म्हणून माझा प्राण तळमळतो आहे कारण त्या फुलबागेची सर ह्या इथल्या फुलबागेला कशी येणार ??

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

नभामध्ये नक्षत्र अनेक असतील पण मला माझा भारतमातेचाताराच अतिशय प्रिया आहे. इथे अनेक भव्य नि दिव्य प्रासाद म्हणजे महाल असतीलही पण मला माझी आईची झोपडीच खूप प्रिय आहे. तिच्याशिवाय मला राज्यही नको. मला तिचा वनीचा वनवासही प्रिय आहे. त्यामुळे आता मला हे भुलविणे व्यर्थ आहे. हे सरित्पते, तुझ्या लाडक्या सरितेची म्हणजे नदीची शपथ मी तुला घालतो आहे.

या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला !४!

या फेसंमधून असा निर्दयपणे हसतोयस का??? मला घाबरविण्यासाठी ???? का असा वाचन भंग करत आहेस? साम्प्रत्काली माझ्या भारतभूमीवर अधिराज्य गाजवत असणाऱ्या आंग्लभूमिला घाबरणार्या तू माझ्या मातेला अबला नको समजू ! नाहीतर मी हे त्या अगस्त्य मुनीला सांगेन, ज्याचा मी वंशज आहे ! ज्या अगस्त्याने एका आचमनात तुला प्राशन केले होते त्याचा मी त्याचा वंशज आहे हे विसरू नकोस !
ह्या शेवटच्या कडव्यात तर सावरकरांच्या विलक्षण अशा आत्माभिमानाचे नि आत्मगौरवाचे प्रत्यंतर आपल्याला येते. अगस्त्य मुनींचे दिलेले हे उदाहरणच प्रत्यक्ष प्रमाण आहे. सावरकरांच्या ह्या अद्वितीय प्रतिभेला विनम्र अभिवादन !!!

कवी कुसुमाग्रजांच्या वचनानेच शेवट करतो.
चिरंजीव ह्या हुतात्म्याचा विजयी अभिमान !
इतिहासाविण कुणी करावा ह्याचा सन्मान !!!

हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर कि जय ! छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!
हिंदुराष्ट्र कि जय !! हिंदू धर्म कि जय !!!
जय हिंदुराष्ट्र !!! जय मा भारती !!!

तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३