Thursday, February 26, 2015

छत्रपती शिवराय नि स्वातंत्र्यवीर सावरकर



एतद्देशप्रसुतस्य सकाशात् अग्रजन्मन: !
स्वंस्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवा: !! - मनुस्मृती !
"ह्या राष्ट्रात जन्मलेल्या श्रेष्ठ पुरुषांनी ठिकठिकाणी जाउन आपापल्या चरित्राने ह्या पृथ्वीवरच्या सर्व मानवजातीला सुशिक्षित नि सुसंस्कृत करावं ( आर्य करावं )"
हिंदुस्थानच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्वे जन्माला आली की ज्यांचे मुल्यमापन कालाच्या सीमारेषेत येऊ शकत नाही. विभूतिमत्वाचे स्मरण कोणत्याही काळी व कोणत्याही परिस्थितीत दीपस्तंभाप्रमाणे समाजजीवनाचे मार्गदर्शन करतच असते. श्रीशिवराय हे अशाच प्रतिभेचे धनी आहेत. भगवद्गीतेमध्ये धनंजयाने पुर्ण पुरुषोत्तमाला स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारताना म्हणलंय
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव !
स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ! (२.५४)
त्यावेळी भगवानांनी जे उत्तर दिलंय ते असंय
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् !
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते !! (२.५५)
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश: !
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता !! (२.६८)

स्थितप्रज्ञ म्हणजे "यस्य प्रज्ञा स्थिरा अस्ति" म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा तो ! पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर हीच स्थितप्रज्ञाचा आपणांस दिसून येते. ह्याला प्रमाणच द्यायचं झालं तर समर्थांच्या परमप्रतापी शंभुराजेंना लिहिलेल्या पत्रात आपणांस मिळेल. ते म्हणतात
शिवारायांचे आठवावे रुप ! शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवरायांचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी !
शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे !
शिवरायांची सलगी देणे, कैसी असे !
सकल सुखाचा केला त्याग ! करूनि साधिजे तो योग !
राज्यसाधनेची लगबग, कैसी केली !
ह्यापेक्षा आणखी स्वच्छ नि स्पष्ट पुराव्याची आवश्यकता हवीय काय?



स्थितप्रज्ञ सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं तरीही आपल्याला स्थितप्रज्ञतेचे अलौकिक दर्शन घडतं. मी ह्या दोन राष्ट्रपुरुषांची तुलना अजिबात करत नाहीये. तेवढी माझी योग्यताही नाही नि इच्छाही नाही. कारण ही दोन्हीही माझी लाडकी व्यक्तिमत्वं तर आहेतच पण त्याहीपेक्षा ती दोन्ही सकल हिंदुराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. मला व्यक्तिश: असं वाटतं की शिवरायांची तुलना ही फक्त फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाशी होऊ शकते, अन्य कुणाशीही नाही. तरीही आज सावरकरांचा आत्मार्पण दिन असल्याने हा लेखन प्रपंच गोड मानवून घ्यावा ही विनंती !
सावरकर हे स्थितप्रज्ञच होते हे नि:संशय सत्य आहे.

माझा कान पकडण्याचा अधिकार फक्त शिवरायांनाच आहे - शिवभक्त सावरकर
सावरकर हे लहानपणापासूनच प्रखर शिवभक्त होते. म्हणून तर अगदी कोवळ्या वयाच्या सावरकरांनी अवघ्या सतराव्या वर्षी शिवगीत रचले नि पुढे जाउन शिवप्रभूंची अतिप्रसिद्ध आरती पुण्यात रचली नि सानंद सवंगड्यांसह गायली. फर्ग्युसन महाविद्यालयात आर्यन संघ नावाच्या चोथ्या भोजनासंघाच्या वेळी दर आठवड्याला म्हणायसाठी रचली. वय वर्ष अवघं १९ ! काय म्हणावं ह्या प्रतिभेला??? पुढे जाउन हेच सावरकर बाजीप्रभूंचा पोवाडा लिहताना म्हणतात
तुज भगवान् श्रीशिवराजा
स्वातंत्र्यप्राप्तिच्या काजा
बोलावी तिकडे जा जा
देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला
चला घालुं स्वातंत्र्य-संगरी रिपूवरी घाला !
मद्देशनि माझा राजा
तो प्राण देव तो माझा
मी शरण शिवा सांगा जा !
वसुदेव तूंच शिवराया ! कंसकपटा या ! करूनिया वांया !
स्वातंत्र्य कृष्ण-चिन्मुर्ती !
जा घेउनि आपुल्या हांती !
गडगोकुळांत नांदो ती !
(नाशिक - १९०६)
ही झाली काव्यरचना ! सावरकरांच्या लेखातून तर त्यांची शिवभक्ती प्रत्यही क्षणोक्षणी दिसून येते. छत्रपती शिवराय जर आज जन्माला आले असते तर ते काय बोलले असते हे पाहून सावरकरांनी जो लेख लिहलाय तो वाचला की त्यांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब पहायला मिळतं. सावरकरांचे हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे गीत तर त्यांच्या अत्युत्कट शिवप्रेमाचं द्योतक आहेच.

सावकरांचं हिंदुसमाज संघटन
खरंचर हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे तरीही थोडक्यात सावरकरांच्या ह्या गुणवैभवाचं प्रत्यंतर घेउयात. छत्रपतींनी अठरा पगड ज्ञातींची मोट बांधून हिंदवी स्वराज्य उभारलं. सावरकरांनी पण शिवरायांच्या ह्याच सिद्धांताचं अनुकरण करून हिंदु संघटनाचं अलौकिक नि व्यवहार्य कार्य यशस्वीरीत्या करून दाखवलं. सावरकरांचं संघठन कौशल्य हे इतकं अफाट होतं की अभिनव भारत ह्या संस्थेचा विस्तार हा बृहन्महाराष्ट्रातल्या नाक्यानाक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्रात झालेला होता असं डाॅ. वि. म. भट ह्यांच्या अभिनव भारत ह्या ग्रंथात उल्लेखलं गेलं आहे. पुंढे लंडनमध्ये गेल्यावर तर हे क्रांति-संघटनाचं कार्य अतिशय कठीण होतं कारण तिथे सर्व भिन्नप्रकृतीची लोकं होती. या सर्वांना एका सूत्रांत बांधून त्यांना कार्यप्रवण ठेवणं ही सोपी गोष्ट नव्हतीं मग तो मदनलाल धिंग्रा असो की लाला हरदयाळ असो की सेनापती बापट असोत. सावरकरांच्या त्यावेळीच्या कार्याचं कौतुक एक साम्यवादी नेते बॅ. अरुणा असफअली ह्यांनी करताना म्हटलं होतं की," सावरकर हे प्रतिशिवाजीच होतं ! "
खरंतर एका साम्यवाद्याने अशी उपमा देणं हे चिंतनीयच आहे. शिवरायांचे प्रत्येक मावळे हे खरंतर प्रतिशिवाजीच होते इतकं तेज शिवरायांनी त्यांच्यामध्ये संक्रमित केलं होतं. नेतोजी पालकर हे त्याचं सर्वात जळजळीत उदाहरण. सावरकरांबद्दल पुढे जाउन धर्मवीर डाॅ. मुंज्यांनी सुद्धा म्हटलं होतं की, " आम्ही सावरकरांना शिवरायांच्या खालोखाल मानतो! "

सावरकरांच शुद्धिकार्य
शिवरायांनी बजाजी निंबाळकरांना व नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेतलं होत ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे. इतकंच काय तर सक्तीनं धर्मांतर करणार्या चार ख्रिश्चन पाद्र्यांना म्हणजे धर्मप्रसारकांना पण त्यांनी न ऐकल्यामुळं त्यांना हिंदु करून घेतलं होतं. हे असे पुरावे असताना शिवरायांवर सेक्युलरचेचा बुरखा चढवायचा प्रयत्न करणं म्हणजे द्वेषच आहे. असो. सावरकरांनी पण आजीवन शुद्धीचं जे कार्य केलं त्याचंही चिंतन प्रकट करणं आवश्यकच आहे. अंदमानातलं त्यांचं कार्य तर अलौकिक आहे. अंजमानाच्या त्या भयाण अंधेरीत देह पिचत असतानाही सावरकर हे तिथल्या बंदीवानांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदुंना स्वधर्मात परत घेत. माझी जन्मठेप ज्यांनी वाचलं असेल त्यांना हे माहिती असेल. हे कार्य सतत सुरु होतं. स्थानबद्धतेतही सावरकर गप्प बसले नव्हते. पुढे २१ आॅगस्ट १९५५ सालची गोष्ट. मुंबईत चाळीस कोळी बांधवांचा शुद्धी समारंभ करताना सावरकर म्हणाले होते की, " हे शुद्धी कार्य इतके महत्वाचे आहे की त्यासाठी मला पुनर्जन्म यावा." अध्यक्ष होते जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य ! दार-उल्-इस्लाम नि दार-उल्-हरब ह्या दोन गोष्टींवर तर ते नेहमी भर देत. महामानव डाॅ. आंबेडकरांनी पण हेच ठासून सांगितलं होतं त्यांच्या पाकिस्तान ह्या ग्रंथात. जिज्ञासुंनी ते वाचावं.गांधीजींचं मुस्लीम नि ख्रिश्चन धार्जिणं धोरण नि काँग्रेसचा पाठिंबा नि हिंदुंची स्वाभिमानशून्यता सावरकरांना अस्वस्थ करत होती तरीही सावरकर त्यांचं कार्य नेटाने पुढे चालवत होते. स्थानबद्धतेत तर ते देवल स्मृती नि अत्रि स्मृतीचा दाखला देउन शुद्धीकार्य किती आवश्यक आहे हे विरोधकांना साधार पटवून देत. स्वधर्म प्रचाराचा अधिकार जसा अ-हिंदुंना आहे तसा तो हिंदुंनाही असलाच पाहिजे, असं ते निक्षून सांगत.

विज्ञाननिष्ठ सावरकर
राजाराम महाराज पालथे जन्माला आले म्हणून काही जणांना अपशकूनासारखी बाष्कळ चर्चा केल्यावर छत्रपती तर म्हणाले होते की हा राजाराम अख्खी पातशाही पालथी घालेल. सावरकरांनी शिवरायांचा हा गुण असाच अंगिकारला होता. विज्ञान हाच हिंदुच्या वर्तमानयुगाचा पाचवा वेद झाला पाहिजे असं ते आग्रहाने सांगत. हिंदुंनी विज्ञानाची कांस धरून नवनवीन यंत्रोद्योग उभारावेत नि औद्योगिक प्रगती करून हिंदुराष्ट्र बलशाली, वैभवशाली नि संपन्न बनवावे हीच त्यांची भूमिका होती. यंत्र हे मानवाला अतिमानुष करणारं वरदान आहे, शाप नव्हे, जे सृष्टिनियम प्रयोगान्ती सर्वथा अबाधित, शाश्वत आहेत असं विज्ञान शास्त्रानं सिद्ध झालं, तेच काय ते थरे सनातन धर्म हे त्यांचं विज्ञाननिष्ठ चिंतन होतं.

भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते शिवराय नि सावरकर
शिवछत्रपतींनी रघुनाथपंतांच्या सहाय्याने राज्यव्यवहारकोष निर्माण केला होता हे सर्वश्रुत आहे. शिवरायांनी मराठी भाषेत घुसडले गेलेल्या परभाषिक शब्दांची हकालपट्टी केली नि शुद्ध नि संस्कृतनिष्ठ शब्दांचा राज्यव्यवहारकोष तयार केला. हे भाषेवरचं प्रेम म्हणजे शिवरायांच्या अनेकविध अशा पैलुंपेकी एक महत्वाचे आहे. सावरकरांनीही भाषाशुद्धीची नि जागरणाची जी अलौकिक चळवळ केली ती पाहिली की मन थक्त होते. भाषाशुद्धीचे ते दोघेही कट्टर पुरस्कर्ते होते. सावरकरांनी तर इंग्रजी नि पाश्चिमात्य भाषेतल्या घुसलेल्या शब्दांना अनेक प्रतिशब्द निर्माण केले. खरंतर त्याची एक स्वतंत्र यादीच होत असल्यामुळे विस्तारभयास्तव इथे देत नाही. विरोधकांनी जेंव्हा आक्षेप घेतली की हे परकीय शब्द म्हणजे आम्ही आमच्या भाषेत पचवलेले आहेत नि ती आमची विजयचिन्हे आहेत तेंव्हा त्यांच्या ह्या स्वाभिमानशुन्यतेला नि सद्गुणविकृतेला सावरकर उत्तर देताना सावरकर म्हणाले की, "चुकताय आपण. ती काही आमची विजय चिन्हं नव्हेत तर ती आमच्या भाषेच्या अंगावरील व्रण आहेत, व्रण !"
आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे ! तिला अव्हेरुन इंग्रजी, फारशी इत्यादि परक्या भाषांतून शब्द घेणं म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकुन देऊन, चिनी मातीची कप भांडे हाती घेण्यासारखे आहे ! अशी बहुमोल खाण घरी असताना परक्यांच्या दारी भीक कां मागता???"
आजही आपण बघा की जर शुद्ध नि संस्कृत निष्ठ बोलायला गेले की लोक लगेचच तोंडाकडे बघतात. जणु काही आपण काही अपराधच करताहोत? कधी सुधारणार आहोत आम्ही हिंदु??

कुशल नि कर्तव्यनिष्ठ राजकारणधुरंधर शिवराय

भगवान श्रीकृष्णानंतर शिवरायांसारखा कुशल, धुर्त, मुत्सद्दी नि ध्येयधोरणी राजकारणधुरंधर नेता कुठेच पहायला मिळणार नाही आणि भविष्यात होणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. समग्र शिवचरित्र हे अशा अनेक उदाहरणांना भरलेलं असल्याने मी जास्ती लिहायची आवश्यकता नाहीच. सावरकरांच्या जीवनातही सावरकरांनी हेच राष्ट्रनिष्ठ नि धर्मनिष्ठ राजकारण केलं. १९३९ च्या महायुद्धात ब्रिटन गुंतलेलं असताना आम्ही ह्या अडचणीच्या कालीवधीत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न काढू इच्छित नाही असं गांधीजी नि नेहरु म्हणाले होते. (धनंजय कीरांनी लिहिलेलं गांधींजींचं चरित्र). पण राजकारणधुरंधर सावरकर मात्र "शत्रुची अडचण तो आपला सुवर्णक्षण" ह्या न्यायाने हिंदुस्थानला स्वातंत्र्यप्राप्तीची व्हावी ही संधी साधु इच्छित होते. पुढे महायुद्धात मित्र राष्ट्रांनी जेंव्हा अटलांटिक सनदेची घोषणा केली तेंव्हा ती केवळ स्वार्थासाठी आहे असं ओळखून तिचा धिक्कार करणारे सावरकर एकमेव होते. रुझवेल्टला निरुत्तर करणारे सावरकरच होते. पुढे क्रिप्स नावाच्या धूर्त नि कावेबाज अशा ब्रिटीश मंत्र्याला निरुत्तर करणारे नि योजना झुळीस मिळवणारे सावरकरच होते. नेताजींना "शत्रुचा शत्रु आपला मित्र या नात्याने प्रेरणा देणारे सावरकरच होते. शिवरायांच्या जीवनात हीच नीती त्यांनी पिताश्रींची मुक्तता करण्यासाठी वापरल्याचे पुरावे सर्वश्रुत आहेत.

आस्तिक शिवराय नि सावरकर
शिवरायांना नास्तिक ठरवण्याचा प्रयत्नातं खंडण मी माझ्या १९ फेब्रुवारीच्या मागच्या एका लेखात केलंच आहे. शिवराय हे जसे आस्तिक होते तसे सावरकर हे देखील आस्तिक होते. सावरकरांना आजकाल नास्तिक काहीजण ठरवण्याचा प्रयत्न करताहेत. पण सावरकर हे आस्तिकच होते याचे अनेक पुरावे त्यांच्या वांग्मयात वेळोवेळी पहायला मिळतात. एखादा लेख वाचून जर आपण त्यांना नास्तिक म्हणायला लागलो तर तो घोर अन्याय ठरेल. समर्थांच्या भाषेत ते पढतमूर्खाचं लक्षण ठरेल.
समूळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाच ठेवी जो दुषण !
गुण सांगता अवगुण, पाहें तो एक पढतमुर्ख !
दासबोध - दशक दोन समास दहा !
असो ! मी पुन्हा एकदा सांगतो की या लेखाचा उद्देश्य ह्या दोन राष्ट्रपुरुषांची तुलना करणे अजिबात नसून ह्यातून सावरकर हे कसे शिवरायांचे कट्टर अनुयायी होते हेच सिद्ध करण्याचा आहे. खरंतर हे शिवधनुष्य पेलण्यासारखंय पण मी एक छोटासा प्रयत्न केलाय. शेवट सावरकरांच्याच वाणीने करतो<

.....की हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
" जेव्हा श्रीराम आपले पित्याचे वचनासाठी वरवर, परंतु राक्षसक्षयासाठी मुख्यत: राज्य सोडून वनवासात शिरले तेव्हा त्यांचे ते कृत्य महत् होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली व अपरिहार्य व धर्मयुद्धाला सज्ज होवून रावणाला ठार मारले तेव्हा ते कृत्य महत्तर होते. परंतु जेव्हा शुद्धीनंतरही सीतेला उपवनात 'आराधनाय लोकस्य मुय्चतो नास्ति मे व्यथा' म्हणून सोडून दिली तेव्हा त्यांचे ते अवतारकृत्य महत्तम होते !!! रामाचे व्यक्तिविषयक वा कुलविषयक कर्तव्य त्यांनी त्यांच्या लोकनायकाच्या राजाच्या कर्तव्यासाठी बळी दिले ! रामाचे अवतारकृत्य व श्रीरामचंद्रांची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत, हिंदूंनो, तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारूतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहन्ता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे तो पर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहजलब्ध राहणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला."

हिॅदुह्रदयसम्राट, हिंदुत्वाचे अग्रणी, हिंदुधर्माचे नुतन शुक्राचार्य, वैनतेय स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचा विजय असो !!!
जय भवानी ! जय शिवाजी !! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!

तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३