Tuesday, May 19, 2015

कालच्या पंडित नथुराम गोडसे ह्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!



महाभारतामध्ये एक श्रेष्ठ नि वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म पितामह ज्यांचा अर्जुनाने रणक्षेत्रावर वध केला ! तो आवश्यकच होता जरी ते त्याचे लाडके काका आजोबा असले तरी ! जरी ते धर्मपरायण नि आजीवन अखंड ब्रम्हचारी नि श्रीकृष्णभक्त असले तरीही. का ??? कारण ते धर्मासाठी नि सत्याच्या विजयासाठी आवश्यकच होतं. गांधीवध देखील असाच आवश्यकच होता.

गांधी हे राजकारणातील भीष्म होते हे मान्य करावंच लागेल. भले त्यांची राजकीय मते ही काही प्रमाणात राष्ट्रहितास घातक ठरलेली असली तरीही त्यांचं हिंदुस्थानच्या राजकारणातलं स्थान हे भीष्माचार्यांप्रमाणेच होतं. म्हणूनच त्यांचा देखील अंत आवश्यकच होता. पंडितजींनी तो केला नि ने अमर झाले. होय अमरच झाले.

राष्ट्रभक्ती हे जर पाप असेल तर त्याचे प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे आणि ते जर पुण्य असेल तर त्यावर माझा नम्र अधिकार आहे असे ठणकावून सांगणारे नथुराम हे प्रखर राष्ट्रभक्त होते. 

लोक आम्हांला म्हणतात की कशाला ती मढी सारखी उकरून काढता???

अहो, का काढू नयेत??? इतिहास कळायला नको का??? ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांचं भविष्य देखील अंधारातच असतं. म्हणूनच हा अट्टाहास ! 

गांधींचा पराभव त्यांच्याच अनुयायींकडून

महापुरुषांचा पराभव काहीवेळी त्यांचे अनुयायीच करतात, असा प्रत्यय येतो. गांधीअंतानंतर हिंदुस्थानात ब्राम्हणांच्या ज्या सरसकट कत्तली झाल्या, त्यावरूनच गांधीवाद तिथेच पराभूत झाला हे गांधीभक्त उदार मनाने मान्य करतील काय??? इतकी अंत:करणाची विशालता तुमच्याकडे आहे काय??? तसंही ब्राम्हणद्वेष ही काही नवीन गोष्ट नव्हती हिॅदुस्थानाला. कारण अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्राम्हणांना संपवायचे घाट घातले जात होते. त्याने तर सहा सहस्त्र ब्राम्हणांची सरसकट कत्तल केली होती. मोंगलांनी नि नंतर ब्रिटीशांनी देखील तेच केलं. ब्रिटीशांचा अधिकारी मॅक्सम्युलर तर स्पष्ट म्हणतो की ख्रिश्चन धर्माचा प्रसार जर हिंदुस्थानात करायचा असेल तर तिथल्या पुरोहिताचा पहिल्यांदा उच्छेद करायला हवा. तसं पत्रही उपलब्ध आहे त्याचं. २५ आॅगस्ट, १८५६ च्या चेव्हलियर बनसेन ह्यांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो

India is much riper for Christianity than Rome or Greece was at the time St. Paul..... I should like to live for ten years quietly and learn the language, try to make friends and then see whether I was fit to take part in a work, by means of which the old mischief of Indian priest-craft should be overthrown and the way opened for the entrance of simple Christian teaching.... Whatever finds root in India soon overshadows the whole Asia. 

पुढे तर तो स्पष्ट म्हणतो २६ फेब्रुवारी, १८६७ ला डाॅ मिल्मन ह्यांना लिहिलेल्या पत्रात 

"I have myself the strongest belief in the growth of christianity in India. There is no other country so ripe for christianity as is India"

"मला पक्की खात्री आहे की भारतात ख्रिश्चन पंथांचा प्रसार होणारच. भारताईतका सुपीक देश जगात कुठेही नाही ख्रिस्तासाठी."

मोनियर विल्यम्स नावाचा संस्कृत-आंग्ल किंवा आंग्ल-संस्कृत शब्दकोषाचा निर्माता देखील १८७९ साली हेच म्हणतो की

When the walls of mighty forces of Brahmanism (Hinduism) are encircled, undermined and finally stormed out by the soldier of the Cross, the victory of the Christianity must be single and complete."

"ब्राम्हणी (हिंदु) धर्माच्या इमारतीला जेंव्हा क्राॅसच्या सैनिकांकडून खिंडारे पाडली जातील, तेंव्हाच ख्रिस्ताचा विजय हा पूर्ण होईल."



ह्यापेक्षा आणखी ढळढळीत पुरावे आवश्यक आहेत का??  तरीदेखील आमच्यातले काही दीडशहाणे ह्या मॅक्सम्युलरला विद्वान म्हणतात. 

म्हणूनच आमच्या देशाला गांधींची नि नथुरामजी दोघांची देखील आवश्यकता आहे. 

हो नक्कीच आहे. आम्हाला पंडित नथुरामजींची प्रखर राष्ट्रभक्ती नि जाजव्ल्य असा हिॅदु राष्ट्रवाद हवाय नि गांधींचे स्वावलंबन, जनमानसावरची पकड, त्यांचे राष्ट्रप्रेम, ह्रदयातील अपार करुणा हवीय. गांधींनी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करण्याचं धाडस इथुन पुढे करून नये ह्यासाठी नथुराम जसे आवश्यक आहेत, तसेच महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे ऋषीतुल्य स्थान असणार्या गांधींची देखील आमच्या राष्ट्राला आवश्यकता आहे. कारण

खरे गांधी तथाकथित गांधीभक्तांनी नि काँग्रेसने पुढे येउ दिलेच नाहीत कधीच

गांधींचे जे काही विचार आज जनमानसात प्रचलित आहेत, त्यातले कितपत ते त्यांचे आहेत हे त्यांचे साहित्य वाचल्यावरच आपल्याला लक्षात येतं. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल हे वाक्य मी तरी कुठे वाचलं नाही. त्यांना राष्ट्रपिता करून फक्त स्वत:चा स्वार्थ साधला एवढंच फक्त त्यांना करता आलं.

गांधींचे हिॅदुत्व काँग्रेसने कधीच पुढे आणलं नाही. त्यांची गोभक्ती कधीच काँग्रेसने पुढे आणली नाही. त्यांचे धर्मांतरावरचे नि शुध्दीकरणावरचे विचार काँग्रेसवाल्यांनी कधीच पुढे आणले नाहीच. जाणूनबुजुन ! ह्याविषयांवर स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. धर्मांतराच्या बाबतीत गांधींचे विचार काय होते नि ते शुध्दीकरणाच्या बाबतीत किती कमालीचे आग्रही होते हे त्यांचं साहित्य वाचल्यावरच कळतं. आज त्यांचं समग्र साहित्य भारत सरकारने १०० खंडांत प्रकाशित केलंय. ते सर्व आंतरजालावर उपलब्ध आहे. पण तथाकथित गांधी भक्त त्यांचे खरे विचार कधीच पुढे आणु देत नाहीत, ही शोकांतिका आहे. 

काँग्रेसने नि गांधींनी अखंड हिंदुस्थान का नाकारला - शेषराव मोरे ह्यांचा ग्रंथ 

ज्येष्ठ विचारवंत मोरे सरांचा हा संशोधनात्मक ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांची अशी पक्की धारणा होते की फाळणी ही झाली ते बरेच झाल. जर तसं नसतं झालं तर मुसलमान हे अखंड हिंदुस्थानात बहुसंख्य झाले असते नि आयुष्यभर ती साडेसाती भारताला सतावत राहिली असती. एका दृष्टीने हे वरवर पाहता योग्य वाटते पण ह्या मागची आमची गुलामगिरीची मानसिकता कुणाच्याच लक्षात येत नाही हे ह्या राष्ट्राचे दुर्दैव आहे. 

कोण कुठला हा इस्लाम??? सहाव्या शतकाच्या आधी ज्याचं अस्तित्व देखील नव्हतं. कोण कुठले हे ख्रिश्चन ? दोन सहस्त्र वर्षांपूर्वी त्यांचं अस्तित्व देखील नव्हतं. पण इतक्या काळात त्यांनी जगावर राज्य केलं. ख्रिश्चनांनी पहिल्या सहस्त्रकात सगळा युरोप नि दुसर्या सहस्त्रकात अमेरिका खिशात घातला. आता हेच ख्रिश्चन १५ डिसेंबर, १९९९ रोजी जाहीरपणे आवाहन करतात की 

Planting the cross in Asia in 3rd millenium

येत्या तिसर्या सहस्त्रकात सगळा आशिया ख्रिश्चन करणे. हे ते करण्यांचं धाडस करतात. 

मुसलमानांनी १४०० वर्षात ५६ देश मुस्लिम केले. ख्रिश्चनांनी १५२ देश आणि आजही हे दोघे आपल्या ध्येयाप्रती सजग आहेत. 


आणि आम्ही हिॅदु??? सर्वधर्मसमभावचे भक्त !!! 

ज्या गोष्टीची लाज वाचायला हवीय त्याचा अभिमान बाळगणारे ! दुसर्यांना हिॅदु करायचं तर लांबच राहिलं, आमच्या धर्मांतरित हिॅदुंना परत घ्यायची देखील छाती आमची होत नाही. आमचेच आमच्या नावानी बोंबलतात. लगेचच बोंबाबोब ! च्यायला आमचं जळतंय ह्याचं आम्हाला काहीच नाही. सर्वधर्मसमभाव म्हणे ! मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना विचारा त्यांना सर्वधर्मसमभाव मान्य आहे का??? एकाच्या तर तोंडी तशी भाषा येते का??? पण आम्ही मात्र गेली ४० वर्षे सर्वधर्मसमभावाचा नाराच लावलाय. सद्गुणविकृती ह्यापेक्षा काय वेगळी असते. एकदा कुराण नि बायबल वाचा मग कळेल हे कितपत खरंय ते ! हिंदुस्थानातले सर्व मुसलमान नि ख्रिश्चन हे मुळचे हिॅदुच आहेत. त्यांना परत हिॅदुत्वात घेणं हीच गांधींजींची पण मनिषा होती नि नथुरामजींची पण. म्हणूनच आम्हाला ते दोघे प्रिय आहेत. 

सेक्युलरिझम नि सर्वधर्मसमभावाचा काडीमात्र संबंध नाही. दोन्ही शब्द वेगळे आहेत.

खरंतर ह्याविषयांवर स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच तरीपण ह्या दोन्ही शब्दांचा काडीमात्र संबंध नाही. केवळ काँग्रेसने पसरविलेली घाण आहे ही. मी स्वत: विधी शाखेचा पदवीधर असल्याने सर्वोच्च न्यायालयाची नक्की भूमिका काय आहे हेदेखील मला मान्य आहे. संविधानकर्ते डाॅ बाबासाहेबांची पण ह्या बाबत काय ठोस भूमिका होती हे पण कधीतरी स्पष्ट करेनच. असो ! तूर्तासतरी एवढंच सांगतो की सेक्युलरिझम आम्हांला मान्य नाही. सर्वधर्मसमभाव तर नाहीच नाही. कारण हिॅदुत्व हेच राष्ट्रीयत्व, राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व ! 
शेवट सावरकरांच्याच भाषेत

"याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या वाचून नि विरोध कराल तर तुमच्या विरोधात उच्छेदूनही पण हिंदु आपल्या सामर्थ्यानुसार स्वातंत्र्याकरिता लढतच राहतील नि हिंदुराष्ट्र घडवतील."

(कर्णावती येथील हिंदु महासभेच्या अधिवेशनात दिलेले भाषण)

जय शिवाजी ! जय भवानी ! जयतु हिंदुराष्ट्रम् !!! वन्दे मातरम् !!! 

तुकाराम चिंचणीकर
Tukaramchinchanikar.blogspot.com

No comments:

Post a Comment