Tuesday, October 7, 2014

शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !



आज शरद पौर्णिमा..! म्हणजेच रास पौर्णिमा..!!! श्रीमद्भागवतानुसार आजच्या रात्रीच पुर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी वृन्दावनामध्ये गोपींसह रासक्रीडा संपन्न केली. भक्तिशास्त्रामध्ये या रात्रीचे फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीमद्भागवता मध्ये दशम स्कंधामध्ये "रासपंच्याध्यायी"नावाने पाच अध्याय आहेत जे भागवताचे पाच प्राण मानले जातात. या पाच अध्यायामध्ये रासक्रीडेची कथा येते.

कात्यायनी व्रताची पुर्तता करुन श्रीकृष्ण हाच पती म्हणून प्राप्त ह्वावा ही इच्छा धरून बसलेल्या गोपींची अंत:करणे ही सुरुवातीला जरी श्रीकृष्णाप्रती कामासक्त होती तरी वस्त्रहरण लीलेनंतर मात्र ती श्रीकृष्णाप्रतीच्या अनन्यसाधारण भक्तीने आेथंबून गेली. वस्त्रहरण लीलेचा मुख्य उद्देश्य नश्वर देहासक्ती नष्ट करून श्रीकृष्णाच्या रुपावर ती आकर्षण करणे हाच होता. या वस्त्रहरण लीलेकडे आक्षेप घेणारे बरेच असले तरीही त्यामागचा उद्देश्य लक्षात घेतला म्हणजे शंकानिरसन होणं शक्य आहे. याबाबत संत नामदेवांचं उदाहरण लक्षात घेण्याजोगं आहे.

नामदेव महाराज स्वतः पांडुरंगाशी रोज बोलायचे, एवढी थोर त्यांची भक्ती ! पण हे मडकं कच्चं आहे हे कळताच गुरुशोधार्थ निघाले आणि विसोबा खेचरांनी त्यांना जो संदेश दिला तो चिंतनीय आहे. ते म्हणतात

"जरी म्हणसी देव देखिला, तरी बोल भला नव्हे नाम्या !
जोवरी मी माझे न तुटे, तंव आत्माराम कैसोनि भेटे ! 
खेचर साह्याने मी काही नेणे, जीवाया जीव इतुले जाणे !"

म्हणजे नुसतं देव पाहिला म्हणून काही उपयोग नाही. जोवर मी आणि माझं असं देहाशी असलेलं ममत्व तुटत नाही, तोवर आत्माराम कैसा भेटेल ?????

याचा अर्थ गोपींच्या अंत:करणातली देहासक्ती नष्ट करणं महत्वाचे असल्याने ही वस्त्रहरण लीला झाली. असो. प्रस्तुत लेखाचा उद्देश्य सुद्धा रासक्रीडेवरच्या आक्षेपांचं खंडण करणे हाच आहे.

रासलीला -  कामलीला नसून ही तर  कामविजयलीला आहे !

समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दुषण !
गुण सांगता अवगुण, पाहे तो एक पढतमुर्ख !
. . .  . . दासबोध - दशक २, समास १०

श्रीमद्भागवत, हरिवंशपुराण, महाभारत या आणि अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर भाष्य करणं हे समर्थांच्या भाषेत पढतमुर्खाचंच लक्षण ठरेल ! त्यातही हिंदुस्थानी नव्हे तर समग्र विश्वाच्या इतिहासातील सर्वात श्रेष्ठ अशा पुर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर अकारण आक्षेपांचं काहूर माजविणार्यांची संख्या काही कमी नाही. म्हणूनच माझ्या अल्पमतीप्रमाणे काही आक्षेपांचं खंडण करण्याचा प्रयत्न करतो आहे.

श्रीकृष्ण रासलीलेचा अध्यात्मिक अर्थ असा आहे की वृंदावन म्हणजे आपले अंतःकरण. श्रीकृष्ण म्हणजे आपला आत्मा. श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर म्हणजे आपल्या अंतःकरणात निघणारा अनाहत नाद ध्वनी जो केवळ ध्यानावस्थेनंतरच योगी लोकांना ऐकू येतो. या ध्वनीने निर्माण होणारया अंतःकरणातील भावना आणि तरंग म्हणजे गोपी. आणि या तरंगांच्या आत्म्याशी होणारया मिलनाचे साधर्म्य रासलीलेशी  आहे. कारण जीवन एक महारास आहे आणि भगवान श्रीकृष्णाशी होणारी ही रासक्रीडा हिच मनुष्य जी वनाची अंतिम पराकाष्ठा आहे, परम ध्येय आहे.

श्रीकृष्ण कामी कसे ???????????

भागवतामध्ये शुकाचार्यांनी श्रीकृष्णाला "साक्षात्मन्मथमन्मथ:" असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की जो मन्मथ म्हणजे कामदेवाचंही मन मथवू शकतो ! जो श्रीकृष्ण कामालाही मथवू शकतो तो कामी कसा??? कारण श्रीकृष्ण हे आप्तकाम आणि आत्माराम आहेत ! रुक्मिणी मातेशी झालेल्या संवादामध्ये स्वतः ते म्हणतात की,

उदासीन: वयं नुनं न स्त्रीअपत्यर्थ कामुक: !
आत्मलब्ध्यास्महे पूर्णा: गेहयो: ज्योतिरक्रिया: !

"म्हणजे आम्ही स्त्री, अपत्य, अर्थ आणि काम यासंबंधी खरंच उदासीन (निरासक्त) आहोत. देह-गेहाशी संबंधित सर्व बाबतीत आत्मकाम( पुर्णकाम) आहोत."

याचा अर्थ स्पष्टच आहे की या रासक्रीडेत कामाचा स्पर्शही नाही. आणि समजा असला तरी ही कथा ज्या शुकाचार्यांनी सांगितली ते शुकाचार्य स्वतः आजीवन अखंड ब्रम्हचारी असे समाधिस्थ योगी होते. मग ते तरी अशी कामकथा कशी काय रंगवून सांगतील??? आणि ही कथा एेकणारा परीक्षित हा स्वतः मरणाच्या दारात उभा असताना कामकथा एेकण्यात रस दाखवेल काय???

म्हणूनच ही कामक्रीडा नसून कामविजयलीला आहे.

अंतःकरणातला कंदर्प म्हणजे जो काम, तो नष्ट करण्याचे सामर्थ्य या कथेमध्ये असून ही कथा भक्तीरस वाढवणारी असून ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर करणारी आहे. या रासपंच्याध्यायीमध्ये काम नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे असं स्वतः शुकाचार्यांनी सांगितलं आहे. म्हणूनच ह्या कथेला विशेष महत्व आहे.

कामावरचा आक्षेपांचं खंडण !

काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर हे षड्रिपु अगदीच वाईट आहेत का हो??? तर उत्तर मुळीच नाही ! जर कामच नाही अवलंबिला तर सृष्टीचक्र बंदच होईल. क्रोध नसेल तर पराक्रम आणि संरक्षण कसे होईल??? पण धर्मशास्त्रानुसार हे षडरिपु नियंत्रणाखाली असावेत हीच माफक अपेक्षा आहे. याचाच अर्थ हे उपभोग संयमित अंत:करणानेच उपभोगावेत. असो.

रासपंच्याध्यायीमध्ये आलेली गीते !

श्रीकृष्णाच्या भक्तीरसाने आेथंबून वहात आलेली ही गीते भागवत परंपरेत सर्वश्रेष्ठ आहेत. ही जितकी अनुकरणीय आहेत तितकीच गेय आणि रसभरित आहेत ! गोपीगीत, भ्रमरगीत, वेणुगीत !
श्रीमद्भागवतामध्ये जी काही गीते आहेत त्यामध्ये गोपीगीत हे सर्वश्रेष्ठ आहे. विरहवेदनेने व्याकूळ झालेल्या, अगदी अर्धमेल्या झालेल्या गोपींच्या तोंडून पडलेले हे गोपीगीत म्हणजे भक्तीची पराकाष्ठा आहे. गोपी या श्रीकृष्णाला शोधता शोधता इतक्या श्रीकृष्णमय झाल्या कि त्या स्वतःलाच श्रीकृष्ण समजून क्रीडा करू लागल्या. यमुनेच्या तीरावर येऊन सगळ्या गोपींनी एकमुखाने गोपीगीत गायले. कारण सगळ्यांची मने पूर्णतः  श्रीकृष्णमय झालेली असल्याने त्यांच्या तोंडून सर्वामुखाने एकाच गीत बाहेर पडेल यात शंका ती कोणती??? या गोपिगीतामध्ये २९ श्लोक असून हे गोपीगीत "कनक मंजिरी" छंदामध्ये आहे.  गाण्यास अतिशय गेय आणि भक्तीरसाने ओतप्रोत असे आहे. हे गोपीगीत श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे अनुकरण करून भगवंताशी एकरूपता साधण्याची अलौकिक अशी जी काही भक्ती गोपींनी दाखवली आहे त्याला इतिहासामध्ये तोड नाही. हे नित्य पठण करायचे असून त्याने अवश्य भक्ती वाढविता येते. तेंव्हा भक्तीरसाचे परमरहस्य अशा या रासक्रीडेचे पठण करून आपणही भगवान श्रीकृष्णाच्या कृपेचे पात्र बनुयात.

शरद पौर्णिमेच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा !

गोपालकृष्ण भगवान की जय !
राधारमण वृंदावन बिहारीलाल की जय..!
पूर्ण पुरुषोत्तम पूर्णावतार श्रीकृष्ण चंद्र भगवान की जय ! जय श्रीराधे...!!!  जय श्रीकृष्ण..!!!

।।गोपी गीत।।

जयति तेडधिकं जन्मना व्रजः
श्रयति इन्दिरा शश्वदत्र हि।
दयति दृश्यतां इक्षु तावका
स्तवयि धृतासवस्त्वां विचिन्वते।।1।।

शरदुदाशये साधुजातसत्
सरसिजेदरश्रीमुषा दृशा।
सुरतनाथ तेडशुल्कदासिका
वरद निध्नतो नेह किं वधः।।2।।

विषजलाप्ययाद् व्यालराक्षसाद्
वषॅमारूताद् वैधुतानलात्।
वृषमयात्मजद् विश्वतोभया-
दृषभ ते वयं रक्षिता मुहुः।।3।।

न खलु गोपिकानन्दनो भवा-
नखिलदेहिनामन्तरात्मदृक्।
विखनसाडथितो विश्वगुप्तये
सख उदेयिवान् सात्वतां कुले।।4।।

विरचिताभयं वृष्णिधुयॅ ते
चरणमीयुषां संसृतेभॅयात्।
करसरोरूहं कान्त कामदं
शिरसि धेहि नः श्रीकरग्रहम्।।5।।

व्रजजनातिॅहन् वीर योषितां
निजजनस्मयध्वंसनस्मित
भज सखे भवत्किङरीः स्म नो
जलरूहाननं चारू दशॅय ।।6।।

प्रणतदेहिनां पापकशॅनं
तृणुचरानुगं श्रीनिकेतनम्।
फणिफणापॅितं ते पदाम्बुज
कृणु कुचेषु नः कृन्धि हृच्छयम्।।7।।

मधुरयागिरा वल्कुवाक्यया
बुधमनोतज्ञया पुष्करेक्षणं।
विधिकरीरिमा वीरमुह्यती-
रधरसीधुनाडडप्याययस्व नः।।8।।

तव कथामृतं तप्तजीवनं
कविभिरीडितं कल्मषापहम्।
श्रवणमंङगलं श्रीमदाततं
भुवि गृणन्ति ते भूरिदा जनाः।।9।।

प्रहसितं प्रिय प्रेमवीतक्षणं
विहरणं च ते ध्यानमङ्ग्लम्
रहसि संविदो या हृदिस्पृशः
कुहक नो मनः क्षोभयन्ति हि।।10।।

चलसि यद् व्रजच्चारयन् पशून्
नलिनसुन्दरं नाथ ते पदम्।
शिलतृणाङकुरैः सीदतीति नः
कलिलतां मनः कान्त गच्छति।।11।।

दिनपरिक्षये नीलकुन्तलै-
वॅनरूहाननं बिभ्रदावृतम्।
धनरजस्वलं दशॅयन् मुहुः
मॅनसि नः स्मरं वीर यच्छसि।।12।।

प्रणतकामदं पद्मजचितं
धरणिमण्डनं ध्येयमापदि।
चरणपङक्जं शन्तमं च ते
रमण नः स्तनेष्नपॅयाधिहन्।।13।।

सुरतवधॅनं शोकनाशनं
स्वरतवेणुना सुष्ठु चुम्बितम्।
इतररागविस्मारणं नृणां
वितर वीर नस्तेडधरामृतम्।।14।।

अटति यद् भवानह्नि काननं
त्रुटियुगायते त्वामपश्यताम्।
कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते
जड उदीक्षतां पक्ष्मकृद् दृशैम्।।15।।

पतिसुतान्वयभ्रातृबान्दवा-
नतिविलङध्य तेडन्त्यच्युतागताः।
गतिविदस्तवोद् गीतमोहिताः
कितव योषितः कस्त्यजेन्निशि।।16।।

रहसि संविदं हृच्छयोदयं
प्रहसिताननं प्रेमवीक्षणम्।।
बृहदुरः श्रियो वीक्ष्य धाम ते
मुहुरतिस्पृहा मुह्यते मनः।।17।।

व्रजवनौकसां व्यकितरङग ते
वृजिनहन्त्रयलं विश्वमङग्लम्।
त्यज मनाक् च नस्तवत्स्पृहात्मनां
स्वजनहृदरूजं यन्निषूदनम्।।18।।

यत्ते सुजातचरणाम्बुरूहं स्तनेषु
भीताः शनैः प्रिय दधीमहि ककॅशेषु।
तेनाटवीमटसि तद् व्यथते न किंस्वित्
कूपाँदिभिभ्रमति धीभॅवदायुषां नः।।19।।

इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूवाँधेँ रासक्रीडायां ||

गोपीगीतं नामैकत्रिंशोडध्यायः।।




Friday, October 3, 2014

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

धर्माचे पालन, करणे पाखंड खंडण !
हेचि करणे अम्हांसि काम, बीज वाढवावे नाम !!
  . . . . . . . .  . . . . . . जगद्गुरु तुकोबाराय

राष्ट्राय स्वाहा ! इदं न मम् !

आजच्या दिवशीच विजयादशमीच्या मुहूर्ताला १९२५ या वर्षी संघाची स्थापना झाली ! डॉ. केशव बळीराम हेडगेवार या ऋषीतुल्य अशा राष्ट्रासाठी जीवनसर्वस्व अर्पण केलेल्या महामानवाने या आजच्या जगातल्या सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेची मुहुर्तमेढ रोवली !

वटवृक्षाची बी हे मोहरीहूनही छोटं असतं पण त्याचंच रुपांतर शेवटी विशाल अशा वटवृक्षात झालेलं आपण अनुभवतो. संघाच्या बाबतीत हेच घडून आलं आहे. खरंतर कुठल्याही संस्थेचे यशापयश हे त्या संस्थेची तत्वे, कार्यपद्धती, कार्यकर्ते आणि उद्देश यावरच अवलंबून असतं. संघाचं हे यश याच चत:सुत्रीचं फलित आहे. संघाची संस्थापना ही केवळ स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झाली नसून हिंदुस्थानाला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीही झाली आहे. जर तसं असतं तर हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्त होताच "अभिनव भारता" या स्वतःच संस्थापिलेल्या संघटनेची सांगता केली तसाच संघाचाही सांगता समारंभ पारपडला असता ! पण हे नाही झालं कारण ध्येय अजूनही अपूर्ण आहे !!!

होय ! हे हिंदुराष्ट्र आहे - डॉ. हेडगेवार !

हिंदुत्व, हिंदुराष्ट्र हे शब्द जरी एेकले तरी काही जणांना लगेचच विंचु चावल्यासारख्या वेदना होतात. मग ते काँग्रेस आणि त्यांची  पिलावळ असो, पुरोगामी ब्रिगेड असो की अन्य कोणी ! खरंतर स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महायोगी अरविंद यांसारख्या महापुरुषांनी हिंदुत्व नि हिंदुराष्ट्र या दोन्ही संकल्पनांचा सांगोपांग विचार सतत आपल्या साहित्यातून केलेला असूनही आम्ही कपाळकरंटे मात्र ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कारण विरोधकांनी हेतुपुरस्सर विद्रोही विचार करून आमचा बुद्धिभेद केल्यावर याच्या मुळाशी जाण्याचा फारच थोडेफारच विचार करतात ! असो. आज याविषयी सविस्तर बोलणं माझ्या मनात नसलं तरी भविष्यात मात्र नक्कीच माझी भूमिका मांडेन !


संघावरची अकारण टीका आणि त्याला प्रत्युत्तर !

ज्यांनी आयुष्यात कधी संघाची पायरी चढली नाही असे लोक संघावर टीका करताना दिसतात. यातले बरेचसे बुद्धिवादी आणि उच्चपदस्थ असल्याने आणि त्यांना मानणारा वर्ग बहुसंख्य असल्याने नेमकी इथेच फसगत होते. साहित्यिकांनापासून ते समाजसेवकांपर्यंत आणि राजकारण्यापासून ते बुद्धिवाद्यांपर्यंत ! खरंतर या टीकेत नक्की वास्तव किती असतं हे पहायची कुणाचीच तयारी नसते. एखाद्याला काहीतरी अनुभव येतो आणि त्यालाच प्रमाण मानून आपण सर्व व्यवस्थाच दोषी आहे असा सोयीचा निष्कर्ष काढतो. असो.

संघावरच्या सगळ्या टीकांचं उत्तर देणं मला विस्तारभयास्तव शक्य नाही. मी संघाचा प्रवक्ताही नाही. तरीही एक विचार प्रेमी म्हणूनच हा प्रपंच !

१. संघ जातीवादी आहे म्हणे. फक्त ब्राह्मणांचा आहे म्हणे - कोणी सांगितलं ???? अरे, तुम्हाला कुणी अडविलं आहे काय संघात यायला ?? लाज वाटते का तुम्हाला ??? आज संघात सगळे हिंदु एकगठ्ठा आहेत. मग जातीयवादी कसा???

२. संघ परधर्मद्वेष्टा आहे म्हणे ???

कुणी सांगितलं ??? संघानेच मुस्लिम जागरण मंच स्थापन केला असून त्यांना ही बरोब्बर घेतले आहे. संघाचं एेक्यमंत्र ज्यांनी वाचला असेल त्यांना त्यात मुस्लिम नावे सुद्धा आहेत. मग तो परधर्मद्वेष्टा कसा??? मुस्लिमांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक ही संघाचीच संकल्पना आहे आणि संघ त्यात हिरिरीने कार्य करत आहे.

हिंदुत्व म्हणजे परधर्मद्वेष अजिबातच नव्हे !


३. लालपावट्या साम्यवाद्यांचा द्वेष आणि प्रत्युत्तर

जण काही श्रमिक वर्गाच्या सर्वोन्नतीचा आपणच ठेका घेतला आहे अशा आविर्भावात वावरणार्या लालपावट्यांनी तर आपली हयात संघद्वेषातच  घालवली. पण ह्याच संघाने आदरणीय श्री. दत्तोपंत ठेंगडींच्या अध्यक्षतेखालीच भारतीय मजदूर संघ, इंटक यांसारख्या अनेक संस्था स्थापन करून श्रमिकांच्या अनेक चळवळी उभ्या केल्या, हे किती जणांना माहिती आहे???

४. संघाचं सांस्कृतिक कार्य काहीच नाही ????

मग संस्कृत भारती, संस्कार भारती या संघटना कोणी स्थापन केल्या???

५. संघाचं हिंदुत्व बोथट???

दुर्दैवाने काही हिंदुत्ववादी संघटनाच ही टीका करतात तेंव्हा दुःख होते. जर हे खरं असतं तर मग बजरंग दल कुणी संस्थापिली??? विश्व हिंदु परिषद कुणी संस्थापिली???

आपल्या पैकी बर्याच जणांना माहिती नसेल पण विश्व हिंदु परिषद हे नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलं आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरुजी हेच परिषदेच्या पुढाकारात होते. "पुरोगामी" महाराष्ट्राला ह्या गोष्टीचा साक्षात्कार कधी होणार आहे देवच जाणे !!!

६. संघाला हाफ चड्डी म्हणणार्याना खुलं आवाहन !

आपणही अशी संस्था निर्माण करावी आणि मग बोलावं. संघावर किती वेळा बंदी घातली तरीही संघ अजूनही फोफावतच आहे ! कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे!

शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी !!!

संघे शक्ती कलियुगे !

कलियुगात एकट्याने काम होणार नाही. ते एकत्र होऊनच पुर्ण होईल !!!


जय हिंदुराष्ट्र ! जय माँ भारती !!!