Tuesday, August 25, 2015

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण




तुका म्हणे भय न धरी माणसी ! ऐसीयाचे विषी करिता दंड !
तुका म्हणे सत्य सांगे ! येवोत रागे येतील ते !
गुण अवगुण निवाडा ! म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव ! खर्या खोट्या निवडी भाव ! अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात ! तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी ! धक्का खवंदासी लागतसे !
टाका तार्किकाचा संग ! पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको ! आपण ते शिको नयें !
जगद्गुरु तुकोबाराय

सर्वप्रथमच आम्ही स्पष्ट करु इच्छितो की ह्या लेखाचा उद्देश्य ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्याचा आहे.

चरितम् शिवराजस्य भरतस्यैव भारतम् !

शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. ह्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होउ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते किॅवा नाही हा वाद मुद्दाम पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो नि जातीपातीचं राजकारण केलं जातं.शिवाजी महाराज खरंच गोब्राह्नणप्रतिपालक होते का?? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे ??? नक्की गौडबंगाल काय आहे हे??? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टाहास !

गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय???

महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किॅवा नाही हे पहायच्या आधी गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे नक्की काय हे समजुन घेऊ. गो म्हणजे गाय ही हिॅदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी "अघ्न्य" म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असं प्रतिपादन करतात. त्यांचा शंकांचं निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश्यही नाही. त्यामुळे शिवाजीमहाराजांनी गाईंचे संरक्षण नि प्रतिपालक स्वत:ला म्हटलं तर त्यात पाप ते काय??? पोटात गोळा यायचं कारण काय??? डाॅ आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिॅदु धर्मावर टीका करणारा मनुष्य देखील देखील गोहत्या करु नका असं त्यांच्या Untouchables - who were they ह्या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात
"जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती"

आता ब्राह्मणांविषयी !

ब्राह्मण कुणाला म्हणाव ह्याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणे !

यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण: !
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। !

म्हणजो जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो, किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचं पालन करतो तो ब्राह्मण ! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आतारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण !

समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितलं आहे

करिती ब्रह्मनिरुपण ! जाणती ब्रह्म संपूर्ण !
ते चि जाणावे ब्राह्मण ! ब्रह्मविद् !
दशक ६.४.२४

हे ब्रह्मनिरुपण किॅवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात

जयांसि झाले आत्मज्ञान ! ते चि थोर महाजन !
वेदशास्त्रे, पुराणे ! साधु-संत बोलिले !
दशक - ६.४.१९

ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान ! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किॅवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्नण.

आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किॅवा आचारसंहिता आवश्यक आहे ती गोतेत भगवंत खालीलप्रमाणे सांगतात

शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च !
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् !

शम, दम् तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किॅवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.

आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे??? अशा व्यक्तींचं संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय??? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किॅवा तत्वज्ञ किॅवा काहीही मार्गदर्शक आहोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत Z Plus सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचं प्रतिपालन केलॅ असेल तर त्यात बिघडलं कुठं???? ह्याचं पाप ते काय??? किॅवा ह्यात जातीवाद तो काय???? ह्यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय???

हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते ! हे घ्या पुरावे ! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न !

सर्वप्रथम आपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे

श्रीशिवराय गोब्राह्मणप्रतिपालक असल्याचा पुरावा 👇

शिवकालीन पत्रसारसंग्रह - शके १५६९ म्हणजे १६४७-४८ -  पत्र क्रमांक २५१९ त्यात उल्लेख आहे की

"महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती"



श्रीशंभुराजेंनी स्वत: बाकरेशास्त्रींना दिलेल्या त्यांच्या संस्कृत दानपत्रात शिवरायांना "देवद्विजप्रतिपालक" म्हणजे ब्राह्मण प्रतिपालक म्हटलंय !

ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा

नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्नण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
हे समजल्यावर शिवछ्त्रपतींनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुको राम ह्याला पत्र लिहिल आहे
"नलावड्याने मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली याचा नतीजा तोच पावला."
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ क्रमांक २४ चे पत्र

समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे

शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते. आणि ह्याबाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. हे शिवचरित्र जरी अफझुल्ल्याच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपतींच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे. शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी ह्या ग्रंथात शिवजन्माची नि अफझुलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळते ह्यावरूनच ते त्याला कुणीही आक्षेप त्यावेळी तरी कुणी घेतलेला नाही. ह्यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती होती त्यामुळे ते विश्वसनीय खात्रीनेच आहे. अफझुलखान प्रकरणात आणि आग्राच्याही प्रकरणात परमानंद शिवछत्रपतींबरोबर होते ह्याचा पुरावा आहे. आता गोब्राह्नणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु.

देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक: !
(पहिला अध्याय १५ वा श्लोक)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्नण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा

देवानां ब्राह्नणानां च गवां च महिमाधिकम् ! ३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचं वर्णन आहे

त्याकाळच्या स्खितीचं वर्णन करताना परमानंद म्हणतात
न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय: !
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोsपि !
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(५ वा अध्याय ४०-४२)

अफझुलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात

सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम् !
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच

शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंदांच्या ब्राह्मण ज्ञातीचा अडसर वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु.

आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु

ह्या सगळ्यावर संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिलं आहे त्यातील पुरावे !
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - २४ आॅगस्ट, १६८०
"सुरुवातीला शंकराला नमस्कार, सद्गुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार !"
पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो तो शंभुराजा असा मी

शिवरायांचे वर्णन करताना ते म्हणतात

शिवराय हे शंकराचे अवतार, वेद,
शास्त्र, स्मृति, आगम, पुराण ह्यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे सरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिॅदुधर्माचा जीर्णोध्दार ज्याने केला, अफझुलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृंसिहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता !"
आता स्पष्टपणे वर ते शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय??? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल तर ह्या खालील पुरावे पहा.

शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण

पुन्हा एकदा हे सांगणं आवश्यक आहे की ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्नण ठरतो. जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात

अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !

खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,

ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.

नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ अध्याय १२ ते १४ श्लोक

दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.

ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....

शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात

धर्मपरंपरेने चालणार्या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता ह्यांचा आशिर्वाद,
सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
ह्या पेणा आणखी काय पुरावा हवाय???

आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक का म्हटलं नाही???? त्याला आमचं उत्तर

कुणाचं नाव घेऊ नये ह्याची शास्त्रात जी यादी आहे त्यात स्वत:चे व गुरुचं नाव घेऊ नये.
आत्मनाम गुरोर्नाम नामानि कृपणस्यच !
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो: !

मी मी म्हणु नये थोडक्यात स्वत:चं कौतुक करू नये, गुरुचं नाव घेऊ नये, कंजुस माणसाचं नाव घेऊ नये, ज्येष्ट पुत्राचं आणि बायकोचं नावघेऊ नये असं  शास्त्र सांगतं.

शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसं मिरवलं नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हचे असं म्हणणं जसं मुर्खपणाचंच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक असं मिरवणंही तितकंच अप्रस्तुत वाटतं. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावडयाचा पत्रातून हे स्पष्ट होतंच आहे.
ह्याच्या उपरही काहीजणांना शंका असेल तर त्यांच्यापुढे आम्हांस हतबलच वाटेल. त्यामुळे इथेच लेखणीला विराम देतो.

प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिॅदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंतश्रीशिवछत्रपती महाराज की जय !!! हिंदुराष्ट्र की जय !!! आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म की जय !!! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!

तुकाराम चिंचणीकर

3 comments:

  1. Very good information.. Jay Bhavani Jay Shivaji..!

    ReplyDelete
  2. फारच छान अभ्यासपूर्ण लेख..
    खूप दिवसांपासून ही माहिती इतक्या विस्ताराने हवी होती..
    धन्यवाद.🙏

    ReplyDelete