Monday, August 22, 2011

पूर्ण पुरुषोत्तम पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण की जय !

 
ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानंद विग्रह: !
अनादिरादिर्गोविंद: सर्वकारणकारणम !! १ !! ब्रम्ह्संहिता
 
"भगवान श्रीकृष्ण परम ईश्वर आहे.त्याचा विग्रह सत+चित+आनंद = सच्चिदानंद असा परिपूर्ण आहे.तो सर्वांचा आदि आहे पण त्याचा कोणीही आदि नाही. तो सर्व कारणांचे परमकारण आहे."

आपली इंद्रिये ही मर्यादित आहेत.म्हणजे हाताचे काम फक्त हातच करून शकतात. डोळ्याचे काम पाहण्याचे जे डोळेच करू शकतात. इथे मानवी इंद्रियांची मर्यादा लक्षात येते. पण भगवान श्रीकृष्ण यांच्या बाबतीत असे नाही. त्यांची कोणतीही इंद्रिये कोणतीही कार्ये करू शकतात. म्हणजे डोळे हाताचे कार्य करू शकतात आणि हात डोळ्याचे पाहण्याचे कार्य करू शकतात. याचि पुष्टी खालीलप्रमाणे आहे।
 
अंगानि यस्य सकलेंद्रिय वृत्ती मन्ति!
पश्यन्ति पंती कलयन्ति चिरं जगन्ति !
आनंद चिन्मय सद उज्ज्वल विग्रहस्य !
गोविन्दम आदिपुरुषम तम अहं भजामि !! ३८ !!  ब्रम्ह्संहिता
 
अशा या परमावतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा  आज जन्मदिवस ! श्रावण वद्य अष्टमी !

कर्षयति इति कृष्ण : ! (जो आकर्षित करतो तो कृष्ण ) 'कृ' या संस्कृत  धातूपासून कृष्ण हा शब्द आला आहे.
 
श्रावण वद्य अष्टमीला रात्री बारा वाजता वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. वसुदेव म्हणजे विशुद्ध विवेक आणि देवकी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. या दोचांच्या पोटी आनंदकंद परब्रम्ह सच्चिदानंद प्रकट झाले. आठवा महिना आणि आठवा पुत्र. रामावतरात दिवसा १२.०० वाजता आणि सुर्यवन्शात जन्म घेतला म्हणून या अवतारात चंद्रवंशामध्ये रात्री १२.०० वाजता चंद्रप्रकाशात जन्म घेतला.  
साधारणपणे पाच सहस्त्र वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचा अवतार इथे प्रकट झाला. दुष्टांचा संहार करण्यासाठी, सुष्टांचे रक्षण करण्यासाठी हा पूर्णावतार प्रकट झाला. इतर सर्व अवतारांपैकी फक्त हाच अवतार पूर्ण अवतार मानलो जातो. श्रीमदआदिशंकराचार्यांनी सुद्धा "कृष्णस्तु भगवान स्वयं" अशी पुष्टी केलेली आहे.
 
सर्वोत्कृष्ट पुत्र, पिता, प्रशासक, राजनीतिज्ञ, कुशल संघटक, तत्त्ववेत्ता, कुटनितीज्ञ अशी त्याची वैशिष्ट्ये. सर्वच बाबतीत पूर्ण असे हें व्यक्तिमत्त्व. षड्गुणऐश्वर्यसंपन्न  ( यश, कीर्ती, सामर्थ्य, सौंदर्य, श्री आणि वैराग्य ) असा तो परब्रम्ह परमात्मा.
 
भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे मुख्य आधार "श्रीमद्भागवतपुराण" आणि "गर्गसंहिता" आणि "महाभारत" आहेत.  इतर पुराणेही आहेतच. श्रीमद्भागवतपुराण १२ स्कंधांचे असून यात दशम स्कंधात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र येते. यात ९० अध्याय असून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. त्याप्रमाणे गर्गसंहिता विस्तृत प्रमाणात चरित्र प्रतिपादन करते. हा अवतार पूर्णावतार कसा ते खालील प्रमाणे.
 
१.  अववतरण
श्रावण शुद्ध अष्टमीला वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी रात्री १२.०० वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्मतःच चतुर्भुज रुपात वसुदेव आणि देवकी यांच्यासमोर प्राकट्य  करून त्याने दाखवून दिले की मी भगवान विष्णू आहे. आणि वसुदेव आणि देवकी ला आपल्या वरदानाची आठवण ही करून दिली. जन्मतःच मुखावर हास्य विलसत होते.
 
२. बाललीला
श्रीकृष्णाच्या बाललीला म्हणजे भागवत धर्माचे परमरहस्य आहे. आपल्या नटखट बाललीलांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारा हा परब्रम्ह परमात्मा गोकुळात राहिला. शकट उद्धार, यमलार्जुन वृक्ष उद्धार, विषपान देणाऱ्या  पुतना मावशीचा उद्धार, यशोदेला मुखामध्ये अखिल ब्रम्हांडाचे दर्शन या आणि अशा कित्येक लीलांचा समावेश होतो.    
 
३. लोणीचोरी -  तस्कराणाम पती !
असे म्हणतात की श्रीकृष्णाच्या जन्माचे वेळी त्याचे भविष्य सांगणाऱ्या गर्ग ऋषींनी असे वर्तविले की हा मोठेपणी खुप मोठा चोर होईल. कारण तो लोणी चोरेल आणि सगळ्यांची मनेही चोरेल.  म्हणूनच त्याचे नाव "तस्कराणाम पती" हें सार्थ ठरेल. या कृतीमागे भगवंताची भक्तांबद्दलची प्रेमासक्ती दिसून येते.
 
४. ब्रम्हविमोहन लीला
या लीलेमध्ये भगवंतांनी ब्रम्हदेवाला मोहित केले. पृथ्वीवर वावरणारा हा बालगोपालांच्या संगे रमणारा कृष्ण ईश्वर आहे मग आपण याची परीक्षा पाहू असे ब्रम्हदेवाने ठरविले आणि त्यानुसार एकत्र भोजन करणारया गोपाळांच्या मध्ये
 
५. चीरहरण लीला
यमुनेचा पाण्यात विवस्त्र स्नान करणारया गोपींची वस्त्रहरण लीला हा टीकाकारांसाठी टीकेचा विषय आहे.पण ज्यांच्या मनात कामक्रोधादी षड्रिपू वसतात त्यांनाच यावर टीका करावीशी वाटते. ७ वर्षाच्या मुलामध्ये कामवासनेचा लवलेश असणे शक्य तरी आहे का? भगवान श्रीकृष्णांनी या लीलेमध्ये गोपींची वस्त्रे चोरली.  त्या विवस्त्र नहात होत्या. आणि दुसरे असे की या लीलेचा अध्यात्मिक अर्थ असा आहे की तुम्हाला जर ईश्वराला भेटायचे असेल तर आपल्या मनावरचे अहंकार आणि इतर वासनांची मलीन वस्त्रे काढा तर आणि तरच तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकताल. याचा अर्थ ईश्वरप्राप्तीसाठी कामक्रोधादी षड्रिपू त्यागणे आवश्यक आहे. गोपींच्या वस्त्रांची तुलना आपल्या मनातल्या कामक्रोधादी षड्रीपुंबरोबर करावी म्हणजे शंका उरणार नाही.
 
६. रासलीला - रासराशेश्वर भगवान श्रीकृष्ण  
भागवत संप्रदायामध्ये या लीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.रासालीलेचा  अर्थ अध्यात्मिकदृष्ट्या समजून घेण्यासारखा आहे.शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णांनी गोपींबरोबर रासलीला केली. "गोपी" शब्दाचा अर्थ "गोभि: रस: पिबति इति गोपी" जो इंद्रियांचा रस पितो असा आहे."गो" म्हणजे इंद्रिये. रासलीलेमध्ये  भगवंतांनी आपल्या अधारांनी बासरीचे तर छेडले आणि त्या मधुर निनादाने गोपी धावत श्रीकृष्णाला भेटायला आल्या. कुणी भोजन करत होत्या, कुणी आपल्या नवरयाला जेवू घालत होत्या, कुणी बाळाला दुध पाजत होत्या, कुणी शृंगार करत होत्या, कुणी थोरांची सेवा करत होत्या तर कुणी इतर काही कामे करत होत्या. बासरीचा हृदय हेलावणारा स्वर ऐकताच त्या सर्व घाईने हातातले काम तसेच टाकून भगवंताला भेटायला निघाल्या.भेटताच भगवंतांनी येण्याचे कारण विचारले आणि रात्रीची वेळ सांगून परत जायला सांगितले. पण ज्यांनी आपली मने पूर्णतः गोविंदाच्या चरणारविन्दावर समर्पित केली होती त्या गोपी निराश झाल्या. नंतर विनवणी करताच गोविंदाने अनुमती दिली.आणि रासलीलेला सुरुवात झाली. 
 
यात काही टीकाकारांना कामक्रीडा दिसते. पण हें असत्य आहे. कारण वर दिलेच आहे. तरीही काही जण म्हणतील  भगवान श्रीकृष्ण हें सर्व अवस्थांमध्ये समान आहेत मग ते बालपणीचे आणि प्रौढ वयातले सारखेच. पण याला भागवतामध्ये स्पष्ट उत्तर आहे की गोपी जरी भगवान श्रीकृष्णावर कामासक्त होत्या तरी त्यांच्या कामासाक्तीचे रुपांतर शुद्ध प्रेमात झाले. हेच या लीलेचे तात्पर्य आणि ध्येय आहे. रासलीलेचा अध्यात्मिक अर्थ असा आहे की वृंदावन म्हणजे आपले अंतःकरण. श्रीकृष्ण म्हणजे आपला आत्मा. श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर म्हणजे आपल्या अंतःकरणात निघणारा अनाहत ध्वनी जो योगी लोकांना ऐकू येतो. या ध्वनीने निर्माण होणारया अंतःकरणातील भावना आणि तरंग म्हणजे गोपी. आणि या तरंगांच्या आत्म्याशी होणारया मिलनाचे साधर्म्य रासलीलेशी  आहे. कारण जीवन एक महारास आहे आणि भगवान श्रीकृष्णाशी होणारी ही रासक्रीडा हिच मनुष्य जीवनाची अंतिम पराकाष्ठा आहे, परम ध्येय आहे.
 
७. वृंदावनबिहारी
 
बर्हापीडं नटवरवपु : कर्णयो: कर्णिकारं !
बिभ्रद्वास: कनक कपिषं वैजयन्तीं च मालां !
रन्ध्रान वेणोरधरसुधया पूरयन गोपवृन्दै; !
वृन्दारण्यं स्वपदरमणम  प्राविशद गीतकिर्ति: !! (वेणुगीत - श्रीमदभागवत )
 
आपल्य सख्या गोपमित्रांबरोबर भगवान श्रीकृष्ण वृन्दावनामध्ये प्रवेश करत आहेत, त्यांच्या शिरावर मयुरपीस आहे आणि कानावर कणेरीची पिवळी पिवळी फुले, शरीरावर सोनेरी पितांबर  आणि गळ्यामध्ये पाच प्रकारच्या सुगंधित पुष्पांनी बनलेली वैजयन्ती माला आहे, रंगमंचावर अभिनय करणारया श्रेष्ठ नाटककारासारखा वेश परिधान केला आहे, बासरीच्या छीद्रांना ते आपल्या अधरामृताने भरत आहेत, त्यांच्या मागे गोपबाले त्यांच्या लोकपावन अशा कीर्तीचे गान करत आहेत....!  
 
८.कंसवध
आपल्या सख्ख्या मामाचा श्रीकृष्णाने  वध  केला कारण तो अन्यायी होता. वधण्यास योग्य होता. एवढेच नव्हे तर त्याला सायुज्य मोक्षही दिला.आणि त्याचे राज्य जिंकूनही स्वतः उपभोगले नाही तर ते स्वतःच्या आजोबांना शूरसेन यांना दिले.
 
९. रणछोड श्रीकृष्ण
कंसवध केल्याने चिडून जाऊन त्याच्या सासऱ्याने जरासंधाने सतरा वेळा आपल्या २१ अक्षौहिणी सेनेसह मथुरेवर आक्रमण केले. भगवान श्रीकृष्णांनी त्याची सगळी आक्रमणे परतवून लावली पण अठराव्या  आक्रमणावेळी कालयवन नावाच्या एका यवनाचेही आक्रमण मथुरेवर चालून आले. या दोनीही आक्रमणांचा सामना करताना त्यांनी युक्ती लढवली. दोनीही सैन्याची अपरिमित हानी करूनही जरासंध आणि कालयवन यांना जिवंत सोडले आणि कालयवनासमोरून एका पळपुट्या प्रमाणे रणक्षेत्र सोडून  पळून गेले. कालयवनाने  धिक्कार केला. मात्र यामागे राजकीय हेतू होता. कालायावानाने आणलेली अमाप संपत्ती जर यादुवान्शियांच्या हाती लागली असती तर सर्व  यादव हें संपत्तीच्या मदाने अहंकारी झाले असते. आणि दुसरे असे की कालयवनाचा मृत्यू त्यांच्या हातून नव्हता.

१०. रुख्मिणीस्वयंवर 
भगवान श्रीकृष्ण आणि रुख्मिणी यांचा विवाह म्हणजे रुख्मिणीस्वयंवर..! आनंदकंद परमात्मा मायापती ब्रम्हांडनायक आणि चित्शक्ती आदिमाया परब्रम्हस्वरुपिणी माता लक्ष्मी यांचा अनुपम संगम..!

११. सोळासहस्त्र नारींचा पती
"पाति इति पती" (जो रक्षण करतो तो पती) भौमासुराच्या कैदेतून सोळासहस्त्र नारींचा रक्षणकर्ता....! नरकचतुर्दशीला भौमासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तुरुंगात डांबलेल्या सोळासहस्त्र मुलींना जेंव्हा त्यांच्या घरच्यांनी आणि समाजानेही नाकारले तेंव्हा त्यांना स्वीकारून त्यांना अभय देणारा हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण... सोळा सहस्त्र नारींशी एकाच वेळी विवाह करून त्यांच्या बरोबर संसार करणारा हा परब्रम्ह परमात्मा !

१२. भगवद्गीतेचा रचयिता
कुरुक्षेत्रावर किंकर्तव्यमूढ झालेल्या सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाला कर्मयोगाचे अलौकिक तत्त्वज्ञान सांगणारा आणि युद्धास प्रवृत्त करणारा परमेश्वर ! धनंजय अर्जुनाला विश्वरूप दाखविणारा आणि शेवटी तू युद्ध कर असे ठणकावून सांगणारा...!

१३. धर्मो रक्षति रक्षित: !
महाभारत युद्धाच्या वेळी प्रत्येकाने आपली आपली प्रतिज्ञा आणि प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. महारथी कर्णाने दानशुरत्वाची, पितामह भीष्मांनी आजीवन ब्रम्हचर्याची आणि इतरांनी अनेक आपल्या आपल्या प्रतिज्ञा आयुष्यभर पाळल्या. परंतु युद्धाच्या आरंभी "न धरी करी शस्त्र मी, सांगेन चार गोष्टी चार युक्तीच्या" या आपल्या प्रतिज्ञेला युद्धात मोडणारा आणि भीष्म पितामहांवर रथाचे चक्र घेऊन धावणारा हाच धर्म रक्षणकर्ता भगवान श्रीकृष्ण..!

१२. कर्मयोगी श्रीकृष्ण ...
न माम कर्मणी लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ! इति माम योsअभिजानाति कर्मभि: स न बध्यते !!
 जीवनभर कर्मयोगाचा आदर्श ठेवणारा आणि त्यानुसारच आचरण ठेवणारा महान कर्मयोगी !

१३. निरहंकारी भगवान श्रीकृष्ण
पांडवांच्या राजसूय यज्ञात सर्वांना वेगवेगळी कामे वाटून देऊन आपण मात्र आलेल्या अथीतींचे पादप्रक्षालन करणारा ! ज्याचे चरणकमल अंतःकरणात धारण करून योगी विमलाशय होतात, ज्याचे चरणकमल देवादिकांना ही दुर्लभ आहेत तो इतरांचे पादप्रक्षालन करतो...! 
 
१४. कुटनितीज्ञ  आणि राजनीतिज्ञ 
महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाला त्याचे जन्मवृत्तांत  सांगून आपल्या बाजूला घ्यायचं प्रयत्न करणारा, जरासंधाला सतरावेळा  पराभूत करून त्याच्या सर्व सैन्याचा संहार  त्यालामात्र जिवंत सोडणारा (पृथ्वीवर अनावश्यक भर उतरविणारा ), युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाई करणारा, भीष्म पितामहांवर रथचक्र घेऊन जाणारा, कालयवनाला जिवंत सोडणारा आणि पलायन करणारा...! इतिहासात भगवान श्रीकृष्णानंतर अशी नीती फक्त आर्य चाणक्य नि छत्रपती शिवाजी महाराजांनी सार्थपणे अनुसरली. 
 
१५. आत्मकाम पूर्णकाम श्रीकृष्ण
जगत्जननी माता रुख्मिणीशी विनोद करताना तिला भगवान श्रीकृष्ण म्हणतात
 
उदासीना: वयं नूनं न स्त्रिअपत्य अर्थ कामुक :!
आत्मलब्ध्याsस्महे पूर्णा: गेहयो:ज्योतिरक्रिया: !  (श्रीमदभागवत १० स्कंध ६० वा अध्याय )
"आम्ही निश्चितच उदासीन आहोत. स्त्री, अपत्य, अर्थ या संबंधी आम्हाला कोणतीच आसक्ती नाही. आम्ही अत्मासाक्षात्काराने परिपूर्ण आहोत. देहगेहाशी संबंधित क्रीयांशी आम्ही निश्चितच उदासीन आहोत."
 
१६. गोपालक श्रीकृष्ण
भगवान श्रीकृष्ण हें गायीचे पूजक होते. म्हणून त्यांना गो पालक म्हणतात. आजकाल जी गोहत्या चालू आहे त्याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. गाईचे अध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व काय आहे हें सर्वांना माहित आहेच.
 
 
अशा या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनी आपण या पुरुषोत्तमाचे स्मरण करू आणि जीवन त्यालाच समर्पित करू.
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोपालकृष्ण भगवान की जय !
राधारमण वृंदावन बिहारीलाल की जय..!
पूर्ण पुरुषोत्तम पूर्णावतार श्रीकृष्ण चंद्र भगवान की जय !
जय श्रीराधे...!  जय श्रीकृष्ण..!
 
वासनात वासुदेवस्य वासितं भूवनत्रयम !
सर्वभूत निवासोsसि वासुदेव नमोsस्तुते !!
वसुदेवसुतंदेवं कंसचाणूरमर्दनम !
देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरूम !! 
कृष्णाय वाद्सुदेवाय हरये परमात्मने !
प्राणात क्लेश नाशाय गोविंदाय नमोsस्तुते !!