Tuesday, March 17, 2015

स्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन – हिंदू धर्माची अधिकृत सनदच घेतली ! आनंदी आनंद !!!

स्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन – हिंदू धर्माची अधिकृत सनदच घेतली ! आनंदी आनंद !

(Complete Works of Swami Vivekananda - The Charter of Hindu Faith by Bhagini Nivedita )



काल पापमोचनी एकादशी ! माझ्या जीवनातला एक आनंदाचा दिवस ! डेक्कनच्या संभाजी पुलांवर मला स्वामीजींचे दहा खंड जे ग्रंथावली नावाने परिचित आहेत ते प्राप्त झाले. गेल्या आठ वर्षाची इच्छा काल पूर्ण झाली. मी खरच परमभाग्यवान ! हो कारण...



स्वामीजींचे माझ्या जीवनातले आगमन 

मला चांगले आठवते. इयत्ता ८वी, २००१ चे वर्ष ! आमच्या पंढरीतल्या कवठेकर प्रशालेत मी प्रवेश घेतला होता आणि त्याच वर्षी शहरात विवेकानंदांवर एक परीक्षा घेण्यात आली होती. “स्वामी विवेकानंद संक्षिप्त चरित्र आणि उपदेश” या रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या छोटेखानी चरित्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती ज्यासाठी माझ्या वर्गातले आम्ही काहीच जण उपस्थित होतो. माझा एक परममित्र वेदमुर्ती  विवेक कुलकर्णी हादेखील होता. रविवारी ही परीक्षा झाली होती सकाळी १०.०० ते १.०० ह्या वेळेत दीर्घोत्तरी प्रश्नांची. आम्ही थोडे उशिरा पोहोचलो. दुर्दैवाने मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही पण स्वामीजींचे ते चरित्र मात्र माझ्या हृदयपटलावर नि जीवनावर कायमचे कोरले गेले. खरंतर आयुष्यातले मी वाचलेले ते पहिलेच पुस्तक ! पहिल्याच पानावर ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंसाच्या निर्विकल्प समाधी अवस्थेचा प्रसंग आणि सप्तर्षी मंडळातला त्यांचा सुक्ष्म देहाचा प्रवास नि त्यातल्या एका सप्तर्षीला जागे करणारे छोटे बालक म्हणजे ठाकूर स्वतः आणि ते सप्तर्षी म्हणजे स्वतः स्वामीजी ! मला आजही रोमांचित करणारा हा प्रसंग आहे.



पुढे काही वर्षानंतर...

स्वामीजींचे साहित्याचा परिचय मात्र पुढे झाला. माझा एक परममित्र चिदानंद सर्वागोड ह्याने मला स्वामीजींची राजयोग, ज्ञानयोग आणि ठाकुरांचे चरित्र आणि उपदेश हे तीन ग्रंथ ९ वी मध्ये असताना वाचायला दिली. श्रीरामकृष्णांच्या त्या चरित्राने तर मी आल्हादितच झालो. हिंदुस्थानची मागच्या दोन सहस्त्र वर्षांची अध्यात्मिक साधना ज्या एका महापुरुषामध्ये घनीभूत होऊन अवतरली होती असे ठाकुरजी हे ूा चरित्रकार रोमा रोलांचे उद्गार मला नंतर खर्या अर्थाने पटले.  खरंतर तेवढ्या नकळत्या वयात ज्ञानयोग समजणे अशक्यच होते म्हणून मी राजयोगच झपाट्याने वाचून काढला. कारण गूढ नि रहस्यमय विषयांची आवड माणसाला कधीकधी अवघड साहित्याचेही वाचन करायला भाग पाडते. विशेषरूपाने मला राजयोगाने भुरळ घातली. भले तो समजण्यास नि आचरण्यास कठीण असला तरी मला तो फार भावला. अजूनही ति मोहिनी कायम आहे. का कुणास ठाऊक !



अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतरी झाकोनि असावे ! प्रकटोनि नासावे,  हे बरे नव्हे !

समर्थांच्या ह्या उक्तीप्रमाणे स्वामीजींचे पहिले तीन खंड पूर्ण वाचूनच व्याख्यान देण्याचा निश्चय केला. १२ जानेवारी, २०१४ ह्या दिवशी पंढरीत स्वामीजींच्या १५१व्या जयंतीनिमित्त माझे पहिले प्रकट व्याख्यान झाले. त्यासाठी “विवेकानंदांचा विश्वदिग्विजय” हा विषय मी निवडला होता आणि म्हणूनच केवळ ग्रंथावलीवर अवलंबून न राहता मेरी लुईस बर्क या पाश्चिमात्य विदुषीने स्वामीजींच्या जीवनावर प्रकाशित केलेलं संशोधनपर असे साहित्य वाचले. Swami Vivekananda In America – New Discoveries  ह्या नावाने त्यांनी लिहिलेला आंग्लभाषेतला खंड वाचून काढला. आणि मगच व्याख्यान दिले. तो दिवसच वेगळा होता माझ्यासाठी ! असो !

खरंतर स्वामीजींचे साहित्य म्हणजे हिंदू धर्माची अधिकृत सनदच आहे. हे ग्रंथ घेतल्यावर माझ्या मनातले भाव मी फक्त खालील वचनात प्रकट करू शकतो. कैवल्यसम्राट संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतामुळे ज्या रामेश्वर शास्त्रींना जगद्गुरू तुकोबारायांची योग्यता समजून आली, अंगाची लाहीलाही होताच तुकोबांच्या हस्तस्पर्शाने ज्यांच्या सर्वांगाचा दाह शांत झाला, त्या रामेश्वर शास्त्रींनी जे चार अभंग तुकोबारायांसाठी म्हंटले त्यातल्या पहिल्याच अभंगात थोडा बदल करून, त्यांची क्षमा मागून मी म्हणतो

माझी मज आली रोकडी प्रचीती !

पाहुनी ग्रंथावली हर्ष पावें !

स्वामी सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हां थोर !

कां जे अवतार नरनारायणाचा !




ग्रंथावली निर्मिती आणि प्रसार 

स्वामीजींच्या प्रमुख शिष्या कर्मयोगिनी नि समर्पिता, ज्यांचे वर्णन स्वतः स्वामीजींनी “द रिअल लायनेस”, महायोगी अरविंदांनी “अग्निशिखा’ आणि रवींद्रनाथांनी “लोकमाता’ असे केले होते, अशा भगिनी निवेदितांनीच हे समग्र साहित्य संकलित करून छापले. प्रथम चार खंडात छापले गेलेले हे साहित्य नंतर आज दहा खंडात विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. ह्याचे श्रेय आणखी एका व्यक्तीला दिले गेले पाहिजे आणि ती म्हणजे स्वामीजींची विदेशातली व्याख्याने टिपून घेणाऱ्या लेखिका श्रीमती गुडविन बाईसाहेब ह्या होत. खरंतर त्यांचे अनंत उपकार म्हणूनच हे साहित्य आज आपणाला मिळते आहे. कारण त्याकाळी ध्वनिमुद्रण करणारी उपकरणे नसल्याने लघुटंक लेखनाच्या सहाय्याने (short-writting) हे साहित्य ग्रथित केले गेले. खरंतर हे साहित्य म्हणजे समग्र भारताचा आत्माच नि चिरंतन असा शाश्वत झरा आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी एक आठवण ह्या बाबतीत सांगितली आहे की त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात प्राचार्य सोनोमामा दांडेकरांसारख्या लोकोत्तर विद्वानाने देखील त्यांना निक्षून सांगितले होते की तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर विवेकानंदांची समग्र ग्रंथावली ही प्रस्तावना म्हणून तरी वाचा ! फक्त प्रस्तावना म्हणून !!!  ह्यापेक्षा आणखी मोठेपण सांगायचे काय राहिले आहे ??? प्रत्येकाने हे अजरामर साहित्य वाचावे ही नम्रतेची विनंती ! सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यातल्या रामकृष्ण मठाने ह्यातले बरेच साहित्य ध्वनिमुद्रण स्वरुपात प्रकाशित केलय आणि करताहेत. सर्वांनी ते अवश्य घ्यावे आणि ऐकावे ! गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांनी म्हटल्याप्रमाणे जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा ! शेवट भगिनी निवेदितांच्याच शब्दात लेखणीला विराम देतो.



“स्वामी विवेकानंदांच्या वाणींतून आणि लेखणींतून निर्माण झालेल्या साहित्याद्वारा एकीकडे जसा समग्र जगताला अमर ज्ञानज्योतीचा परममंगल लाभ झाला, तशीच दुसरीकडे हिंदू संतानांना स्वतःच्या धर्माची अधिकृत सनद (The Charter of Hindu Faith) प्राप्त झाली. स्वतःच्या धर्मासंबंधी आपण बाळगत असलेल्या आपल्या धारणा बरोबर आहेत किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी हिंदू माणूस आणि स्वतःच्या मुलाबाळांना त्यांच्या पूर्वजांचा धर्म काय होता हे शिकवू इच्छिणारी हिंदू आई ही प्रत्ययोत्पादक आणि विश्वसनीय ज्ञानासाठी यापुढे कित्येक युगे ह्याच ग्रंथांच्या पानांकडे वळतील. भारतातून इंग्रजी भाषेचा लोप झाल्यानंतरही, त्या भाषेतून अवघ्या जगाला प्रदान केले हे पसायदान चिरकाल तसेच अक्षुण्ण राहून प्राच्य आणि पाश्च्यात्त्य देशांमध्ये सारखेच फलद्रूप होत राहील. हिंदू धर्माला जर कशाची आवश्यकता होती तर ती म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा साठा एकत्रित आणि सुसंघटित करण्याची. जगाला आवश्यकता होती – जिला सत्याचे भय नाही अशा एका धर्मश्रद्धेची. स्वामी विवेकानंदांच्या संदेशाने ही दोन्ही कार्ये साधली आहेत.”  

श्रीरामकृष्ण-विवेकानंद पदाश्रित - निवेदिता – ४ जुलै, १९०७



तुकाराम चिंचणीकर – ८८८८८३८८६३


No comments:

Post a Comment