Tuesday, May 19, 2015

कालच्या पंडित नथुराम गोडसे ह्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!



महाभारतामध्ये एक श्रेष्ठ नि वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म पितामह ज्यांचा अर्जुनाने रणक्षेत्रावर वध केला ! तो आवश्यकच होता जरी ते त्याचे लाडके काका आजोबा असले तरी ! जरी ते धर्मपरायण नि आजीवन अखंड ब्रम्हचारी नि श्रीकृष्णभक्त असले तरीही. का ??? कारण ते धर्मासाठी नि सत्याच्या विजयासाठी आवश्यकच होतं. गांधीवध देखील असाच आवश्यकच होता.

गांधी हे राजकारणातील भीष्म होते हे मान्य करावंच लागेल. भले त्यांची राजकीय मते ही काही प्रमाणात राष्ट्रहितास घातक ठरलेली असली तरीही त्यांचं हिंदुस्थानच्या राजकारणातलं स्थान हे भीष्माचार्यांप्रमाणेच होतं. म्हणूनच त्यांचा देखील अंत आवश्यकच होता. पंडितजींनी तो केला नि ने अमर झाले. होय अमरच झाले.

राष्ट्रभक्ती हे जर पाप असेल तर त्याचे प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे आणि ते जर पुण्य असेल तर त्यावर माझा नम्र अधिकार आहे असे ठणकावून सांगणारे नथुराम हे प्रखर राष्ट्रभक्त होते. 

लोक आम्हांला म्हणतात की कशाला ती मढी सारखी उकरून काढता???

अहो, का काढू नयेत??? इतिहास कळायला नको का??? ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांचं भविष्य देखील अंधारातच असतं. म्हणूनच हा अट्टाहास ! 

गांधींचा पराभव त्यांच्याच अनुयायींकडून

महापुरुषांचा पराभव काहीवेळी त्यांचे अनुयायीच करतात, असा प्रत्यय येतो. गांधीअंतानंतर हिंदुस्थानात ब्राम्हणांच्या ज्या सरसकट कत्तली झाल्या, त्यावरूनच गांधीवाद तिथेच पराभूत झाला हे गांधीभक्त उदार मनाने मान्य करतील काय??? इतकी अंत:करणाची विशालता तुमच्याकडे आहे काय??? तसंही ब्राम्हणद्वेष ही काही नवीन गोष्ट नव्हती हिॅदुस्थानाला. कारण अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्राम्हणांना संपवायचे घाट घातले जात होते. त्याने तर सहा सहस्त्र ब्राम्हणांची सरसकट कत्तल केली होती. मोंगलांनी नि नंतर ब्रिटीशांनी देखील तेच केलं. ब्रिटीशांचा अधिकारी मॅक्सम्युलर तर स्पष्ट म्हणतो की ख्रिश्चन धर्माचा प्रसार जर हिंदुस्थानात करायचा असेल तर तिथल्या पुरोहिताचा पहिल्यांदा उच्छेद करायला हवा. तसं पत्रही उपलब्ध आहे त्याचं. २५ आॅगस्ट, १८५६ च्या चेव्हलियर बनसेन ह्यांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो

India is much riper for Christianity than Rome or Greece was at the time St. Paul..... I should like to live for ten years quietly and learn the language, try to make friends and then see whether I was fit to take part in a work, by means of which the old mischief of Indian priest-craft should be overthrown and the way opened for the entrance of simple Christian teaching.... Whatever finds root in India soon overshadows the whole Asia. 

पुढे तर तो स्पष्ट म्हणतो २६ फेब्रुवारी, १८६७ ला डाॅ मिल्मन ह्यांना लिहिलेल्या पत्रात 

"I have myself the strongest belief in the growth of christianity in India. There is no other country so ripe for christianity as is India"

"मला पक्की खात्री आहे की भारतात ख्रिश्चन पंथांचा प्रसार होणारच. भारताईतका सुपीक देश जगात कुठेही नाही ख्रिस्तासाठी."

मोनियर विल्यम्स नावाचा संस्कृत-आंग्ल किंवा आंग्ल-संस्कृत शब्दकोषाचा निर्माता देखील १८७९ साली हेच म्हणतो की

When the walls of mighty forces of Brahmanism (Hinduism) are encircled, undermined and finally stormed out by the soldier of the Cross, the victory of the Christianity must be single and complete."

"ब्राम्हणी (हिंदु) धर्माच्या इमारतीला जेंव्हा क्राॅसच्या सैनिकांकडून खिंडारे पाडली जातील, तेंव्हाच ख्रिस्ताचा विजय हा पूर्ण होईल."



ह्यापेक्षा आणखी ढळढळीत पुरावे आवश्यक आहेत का??  तरीदेखील आमच्यातले काही दीडशहाणे ह्या मॅक्सम्युलरला विद्वान म्हणतात. 

म्हणूनच आमच्या देशाला गांधींची नि नथुरामजी दोघांची देखील आवश्यकता आहे. 

हो नक्कीच आहे. आम्हाला पंडित नथुरामजींची प्रखर राष्ट्रभक्ती नि जाजव्ल्य असा हिॅदु राष्ट्रवाद हवाय नि गांधींचे स्वावलंबन, जनमानसावरची पकड, त्यांचे राष्ट्रप्रेम, ह्रदयातील अपार करुणा हवीय. गांधींनी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करण्याचं धाडस इथुन पुढे करून नये ह्यासाठी नथुराम जसे आवश्यक आहेत, तसेच महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे ऋषीतुल्य स्थान असणार्या गांधींची देखील आमच्या राष्ट्राला आवश्यकता आहे. कारण

खरे गांधी तथाकथित गांधीभक्तांनी नि काँग्रेसने पुढे येउ दिलेच नाहीत कधीच

गांधींचे जे काही विचार आज जनमानसात प्रचलित आहेत, त्यातले कितपत ते त्यांचे आहेत हे त्यांचे साहित्य वाचल्यावरच आपल्याला लक्षात येतं. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल हे वाक्य मी तरी कुठे वाचलं नाही. त्यांना राष्ट्रपिता करून फक्त स्वत:चा स्वार्थ साधला एवढंच फक्त त्यांना करता आलं.

गांधींचे हिॅदुत्व काँग्रेसने कधीच पुढे आणलं नाही. त्यांची गोभक्ती कधीच काँग्रेसने पुढे आणली नाही. त्यांचे धर्मांतरावरचे नि शुध्दीकरणावरचे विचार काँग्रेसवाल्यांनी कधीच पुढे आणले नाहीच. जाणूनबुजुन ! ह्याविषयांवर स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. धर्मांतराच्या बाबतीत गांधींचे विचार काय होते नि ते शुध्दीकरणाच्या बाबतीत किती कमालीचे आग्रही होते हे त्यांचं साहित्य वाचल्यावरच कळतं. आज त्यांचं समग्र साहित्य भारत सरकारने १०० खंडांत प्रकाशित केलंय. ते सर्व आंतरजालावर उपलब्ध आहे. पण तथाकथित गांधी भक्त त्यांचे खरे विचार कधीच पुढे आणु देत नाहीत, ही शोकांतिका आहे. 

काँग्रेसने नि गांधींनी अखंड हिंदुस्थान का नाकारला - शेषराव मोरे ह्यांचा ग्रंथ 

ज्येष्ठ विचारवंत मोरे सरांचा हा संशोधनात्मक ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांची अशी पक्की धारणा होते की फाळणी ही झाली ते बरेच झाल. जर तसं नसतं झालं तर मुसलमान हे अखंड हिंदुस्थानात बहुसंख्य झाले असते नि आयुष्यभर ती साडेसाती भारताला सतावत राहिली असती. एका दृष्टीने हे वरवर पाहता योग्य वाटते पण ह्या मागची आमची गुलामगिरीची मानसिकता कुणाच्याच लक्षात येत नाही हे ह्या राष्ट्राचे दुर्दैव आहे. 

कोण कुठला हा इस्लाम??? सहाव्या शतकाच्या आधी ज्याचं अस्तित्व देखील नव्हतं. कोण कुठले हे ख्रिश्चन ? दोन सहस्त्र वर्षांपूर्वी त्यांचं अस्तित्व देखील नव्हतं. पण इतक्या काळात त्यांनी जगावर राज्य केलं. ख्रिश्चनांनी पहिल्या सहस्त्रकात सगळा युरोप नि दुसर्या सहस्त्रकात अमेरिका खिशात घातला. आता हेच ख्रिश्चन १५ डिसेंबर, १९९९ रोजी जाहीरपणे आवाहन करतात की 

Planting the cross in Asia in 3rd millenium

येत्या तिसर्या सहस्त्रकात सगळा आशिया ख्रिश्चन करणे. हे ते करण्यांचं धाडस करतात. 

मुसलमानांनी १४०० वर्षात ५६ देश मुस्लिम केले. ख्रिश्चनांनी १५२ देश आणि आजही हे दोघे आपल्या ध्येयाप्रती सजग आहेत. 


आणि आम्ही हिॅदु??? सर्वधर्मसमभावचे भक्त !!! 

ज्या गोष्टीची लाज वाचायला हवीय त्याचा अभिमान बाळगणारे ! दुसर्यांना हिॅदु करायचं तर लांबच राहिलं, आमच्या धर्मांतरित हिॅदुंना परत घ्यायची देखील छाती आमची होत नाही. आमचेच आमच्या नावानी बोंबलतात. लगेचच बोंबाबोब ! च्यायला आमचं जळतंय ह्याचं आम्हाला काहीच नाही. सर्वधर्मसमभाव म्हणे ! मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना विचारा त्यांना सर्वधर्मसमभाव मान्य आहे का??? एकाच्या तर तोंडी तशी भाषा येते का??? पण आम्ही मात्र गेली ४० वर्षे सर्वधर्मसमभावाचा नाराच लावलाय. सद्गुणविकृती ह्यापेक्षा काय वेगळी असते. एकदा कुराण नि बायबल वाचा मग कळेल हे कितपत खरंय ते ! हिंदुस्थानातले सर्व मुसलमान नि ख्रिश्चन हे मुळचे हिॅदुच आहेत. त्यांना परत हिॅदुत्वात घेणं हीच गांधींजींची पण मनिषा होती नि नथुरामजींची पण. म्हणूनच आम्हाला ते दोघे प्रिय आहेत. 

सेक्युलरिझम नि सर्वधर्मसमभावाचा काडीमात्र संबंध नाही. दोन्ही शब्द वेगळे आहेत.

खरंतर ह्याविषयांवर स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच तरीपण ह्या दोन्ही शब्दांचा काडीमात्र संबंध नाही. केवळ काँग्रेसने पसरविलेली घाण आहे ही. मी स्वत: विधी शाखेचा पदवीधर असल्याने सर्वोच्च न्यायालयाची नक्की भूमिका काय आहे हेदेखील मला मान्य आहे. संविधानकर्ते डाॅ बाबासाहेबांची पण ह्या बाबत काय ठोस भूमिका होती हे पण कधीतरी स्पष्ट करेनच. असो ! तूर्तासतरी एवढंच सांगतो की सेक्युलरिझम आम्हांला मान्य नाही. सर्वधर्मसमभाव तर नाहीच नाही. कारण हिॅदुत्व हेच राष्ट्रीयत्व, राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व ! 
शेवट सावरकरांच्याच भाषेत

"याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या वाचून नि विरोध कराल तर तुमच्या विरोधात उच्छेदूनही पण हिंदु आपल्या सामर्थ्यानुसार स्वातंत्र्याकरिता लढतच राहतील नि हिंदुराष्ट्र घडवतील."

(कर्णावती येथील हिंदु महासभेच्या अधिवेशनात दिलेले भाषण)

जय शिवाजी ! जय भवानी ! जयतु हिंदुराष्ट्रम् !!! वन्दे मातरम् !!! 

तुकाराम चिंचणीकर
Tukaramchinchanikar.blogspot.com

Tuesday, April 14, 2015

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर नि गोसंरक्षण



आज महामानव डाॅ. बाबासाहेबांची जयंती ! विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्यसंपन्नता हीच ज्यांची गुणवैशिष्ट्ये ते बाबासाहेब ! हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ज्या स्त्री-पुरुषांनी जीवनभर व्रतस्थ राहून विद्वत्ता नि व्यासंगाची आराधना केली, त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रगण्याने घ्यावं लागेल. बाबासाहेबांचा व्यासंग हा चौफेर होता. हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी त्यांनी प्रकट केलेलं चिंतन अतिशय चिंतनीय आहे. ते स्पष्टपणे म्हणतात

"हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटलेले आहे की हिॅदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्वज्ञान, धर्म अध्यात्म यांविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून राजकारणापासून साफ अलिप्त होते. असेही म्हणतात की हिॅदी जीवन व समाज एका ठराविक पोलादी चोकटीमध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले इतिहासकाराचे काम संपले ! हिंदुस्थानचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानांहूनही अगदी निराळे आहे. ह्या अभ्यासांत मला आढळून आले आहे की, जगांत कुठल्याही देशांत हिंदुस्थानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बहुधा एकच देश असा आहे की जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती." - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

 काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्रात गोहत्या बंदी अधिनियम करण्यात आला. त्यावर अनेकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यामुळे ह्या बाबतीत आपल्या संविधानाचे निर्माते महामानव डाॅ. बाबासाहेब ह्यांचे विचार काय आहेत हे पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच ! 




गोसंरक्षण???  होय गोसंरक्षण ! 

साम्यवाद्यांनी नि ब्रिटीशांनी हिंदुस्थानच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे जे निंदनीय प्रयत्न केले, त्याला वाचा फोडण्याचे कार्य ज्या ज्या पुरुषांनी केलं त्यात बाबासाहेबदेखील येतात. गोहत्येचं मुळ भारतात ब्रिटीशांनीच रोविलं ह्याचे ठसठशीत पुरावे आज उपलब्ध आहेत. जिज्ञासुंनी एक गांधीवादी विचारक नि इतिहाससंशोधक प्राध्यापक धर्मपाल ह्यांनी ह्या बाबतीत विलक्षण अभ्यास करून ज्या ग्रंथाची निर्मिती केली आहे, तो "भारतीय गोहत्येचं मुळ ब्रिटीश काळात" ग्रंथ वाचावा. बाबासाहेबांनी पण गोसंरक्षण ह्या विषयांवर असंच संशोधन केलं होतं नि त्यांच्या प्रबंधातही त्यांनी ते प्रकट केलंय. १९४८ साली त्यांनी लिहिलेल्या "The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables” (1948), ह्या ग्रंथात ह्या संदर्भात चिंतन प्रकट केलं आहेच. पण तंस जरी असलं तरीही ह्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. बुद्धिझम असो की वैदिक संस्कृती असो, ह्या दोन्हींनीही गोहत्येचा निषेधच केलाय. वस्तुत: बाबासाहेब तर स्पष्टच सांगतात की गोहत्येच्या विरोधात बुद्धांनीच ठोस पाउलं उचलली आहेत. ते स्पष्ट म्हणतात
“The Buddhists rejected … animal sacrifice, particularly of the cow. The objection to the sacrifice of the cow had taken a strong hold of the minds of the masses as they were an agricultural population and the cow was a very useful animal.”
घटनेचे मुख्य शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी गोपुजनाचे सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक महत्व ओळखलं होतं. त्यांच्या त्याच प्रबंधात ते म्हणतात
“The Hindoo devotion to the Cow has been an enigma to most of the foreigners and above all has been an efficient lore in the hands of those half-baked theological failures who go to India to conduct their missionary propaganda for blackmailing the Hindoo. The origin of cow worship is as much economic as that Roman practice of not offering wine to the Gods from unpruned vines. The cow and for that matter all draft animals, is the soul of the farmers. The cow gives birth to oxen which are absolutely necessary to the cultivation of the farm. If we kill the cow for meat, we jeopardize our agricultural prosperity. With full foresight, the ancient Hindoos tabooed cow-flesh and thus prevented cow killing.” 
भारतीय संविधान नि गोसंरक्षण 
आता आपण ह्याबाबतीत संविधान काय म्हणते ते पाहु. बाबासाहेब हे संविधानाचे लेखक असल्याने त्यांनी संविधानात गोसंरक्षणासंदर्भात ह्यासंदर्भातली तरतुद दूरदृष्टीनेच करून ठेवली होती. ज्यांनी संविधान वाचलं असेल त्यांना हे माहिती असेल की संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही मुलभूत अधिकार (Fundamental Rights) दिले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचबरोबर काही दायित्वही पार पाडण्यास सांगितली आहेत ज्यांना आपण मुलभूत दायित्व (Fundamental Duties) असं म्हणतो. उदाहरणार्थ राष्ट्रध्वजाचा मान राखणे वगैरे. आता हे सर्व सांगत असताना ह्या मुलभूत अधिकार नि दायित्वांबरोबरच काही मार्गदर्शक तत्वे (Directive Principles of State Policy) सुद्धा सांगितली आहेत. ह्याच तत्वांमध्ये प्रस्तुत विषयासंदर्भात खालील मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलं आहे.
The Directive Principle -Article 48 of the Constitution states that
“The State shall endeavor to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and in particular take steps for preserving and improving the breeds and prohibiting the slaughter of cows and other milch and draught cattle. “
 म्हणजे वरील तत्व बाबासाहेबांच्या मनातलेच हेतु स्पष्ट करते. सावरकरांनी देखील ह्याच दृष्टिकोनातून गोसंरक्षण मांडलं आहे. पण त्यांच्या त्या लेखाचा खुप चुकीचा नि सोयीनुसार अर्थ घेउन सावरकरांना गोहत्येचे समर्थक समजण्याची घोडचुक करतात. मागे मी त्यासंदर्भात एक लेख लिहिला होताच ज्यामध्ये मी सावरकर हे कसे गोसंरक्षक आहेत असं दाखवलं होतं. त्यामुळे बाबासाहेब नि गोसंरक्षण हा विषय इथेच स्पष्ट होतो. थोडक्यात काय तर घटनाकार देखील जो विषय ठासून मांडतात तो विषय आम्ही मात्र केवळ धार्मिक दृष्टिकोनातून किंवा अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पाहतोय असं दर्शवून आम्ही आमचाच घात करून घेतो आहोत. कारण बाबासाहेब किंवा इतरही घटनेचे समर्थक जेंव्हा हा विषय मार्गदर्शक तत्व म्हणून संविधानात मांडतात तेंव्हा नक्कीच त्यामागची आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय नि इतर अनेक गोष्टी लक्षात घेउनच हे तत्व त्यांनी मांडलं असावं. शंकेला जागा असायचं कारणच नाही.

गोहत्याबंदीला विरोध म्हणजे संविधानाला विरोध   

गोहत्याबंदीला विरोध करणार्यांनी एकदा तरी संविधान वाचावं किंवा मार्गदर्शक तत्वे तरी वाचावीत. केवळ चित्रपटकलाकार किंवा अन्य कुणीतरी म्हणतंय म्हणूनच गोहत्याबंदी विधेयकाला विरोध करणं किती अव्यवहार्य नि घटनाबाह्य आहे.  केवळ धर्मशास्रांमध्येच गाईचं महत्व आहे असं नाहीतर आपल्या घटनेतदेखील तेच सांगितलं आहे. धर्मशास्त्र नि गोसंरक्षण ह्या विषयांवर लवकरच माझी लेखमाला प्रकाशित होईल. तेंव्हा आतातरी विरोधकांनी शहाणं व्हावं नि सरकारच्या निर्णयाचं स्वागत करावं ही विनंती ! 

शेवट बाबासाहेबांच्याच वाक्यात करतो


We are Indians first and foremost. We should always be proud of our Indianhood. So nothing under the sun can stop us from becoming a superpower. -Dr. B R Ambedkar

थोर इतिहासकार, तत्वचिंतक, जलतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, प्रज्ञासूर्य, घटनाकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!! 



Saturday, April 4, 2015

हनुमान जयंती निमित्त हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाचं एक चिंतन





अश्वत्थामा बलिर्व्यासौ हनुमानश्च विभीषण: !
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: !!

आज हनुमान जयंती. सप्तचिरंजीवांपैकी एक म्हणजे वीर हनुमंत ! नुकतीच रामनवमी साजरी झाली. खरंतर महाबली नि अतुलपराक्रमी नि आजीवन अखंड ब्रम्हचारी अशा श्रीरामचंद्रभक्त  अंजनेय हनुमंताचं चरित्र आम्हांस ज्ञात आहेच पण तरीही त्या नरश्रेष्ठाचं व्यक्तिमत्व नक्की कसं होतं ह्याविषयी रामायणात फार विलोभनीय नि विलक्षण चिंतनीय असं वर्णन आलं आहे. आजकाल व्यक्तिमत्व विकास(Personality Development) हा एक परवलीचा शब्द झाला आहे. अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील ह्याची प्रचंड आवड किंवा आंग्लभाषेतल्या शब्दाप्रमाणे "क्रेझ"आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ह्या व्यक्तिमत्व विकासासाठी हजारो रुपयाचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचं चरित्र वाचलं तरी ही आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल नि व्यक्तिमत्व कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण हनुमंताच्या नि रामचंद्राच्या चिंतनातून नि कार्यातून आपल्याला पहायला मिळेलं. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

रामायणातले किष्किंधा कांड सांगते की मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे सीतेच्या हरणानंतर कबंधाच्या सुचनेनुसार सुग्रीवाचा शोध घेत असताना ऋष्यमुख पर्वतावर आले. तेंव्हा वालीच्या भयाने राज्यापासून दूर असेला सुग्रीव हा ह्या दोन नरश्रेष्ठांना पाहून किंचित आश्चर्यचकित नि शंकामग्न होउन थोड्या भयानेच का होईना पण आपल्या हनुमंत नावाच्या मंत्र्यांस ह्या दोन राजकुमारांची पारख करण्यास पाठवतो. तेंव्हा हनुमंत हे एका ब्राम्हणाचं रुप घेउन राम-लक्ष्मणांना भेटावयांस येतात नि त्यांस आत्मपरिचय देउन त्यांचा परिचय वगैरे विचारतात. हनुमंतांचं रामाबरोबरचे ते संभाषण जरी वाचलं तर हनुमंतांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन तर घडतंच पण त्यापेक्षाही एक दुत म्हणून कसं बोलावं ह्याचा एक आदर्शही प्रकट होतो. हनुमंताचं ते सुमधुर बोलणं ऐकल्यावर श्रीरामचंद्र लक्ष्मणांस हनुमंताचं जे वर्णन करतात ते खालीलप्रमाणे आहे. आणि हेच आजचा आपला चिंतनाचा विषय आहे. श्रीरामचंद्र प्रभु म्हणतात की

नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेदधारिणम् ! 
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम् !! २८ !!

अर्थ - ज्याला ऋग्वेदाचं शिक्षण मिळालेलं नाही, ज्यानं यजुर्वेदाचा अभ्यास केला नाही, जो सामवेदाचा विद्वान नाही, तो याप्रकारे सुंदर भाषेत वार्तालाप करु शकणार नाही ! 

नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ! 
बहु व्याहरतानेन न किंचिदपशाब्दितम् !! २९ !!

अर्थ - निश्तितपणानं ह्या हनुमंताने सर्व व्याकरणाचा अनेक वेळा बारकाईनं अभ्यास केला आहे. कारण इतका वेळ बोलत असुनही त्याच्या तोंडातून एकही अशुद्ध बोल बाहेर पडला नाही !

न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रूवोस्तथा ! 
अन्येष्वपि च सर्वेषु दोष: संविदित: क्वचित् !! ३० !!

अर्थ - संभाषणाच्या वेळी ह्याचे मुख, डोळे, कपाळ, भूवई तसेच अन्य सर्व अंगामधूनही एखादा दोष प्रकट झालेला आहे असं मला दिसला नाही !

अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्ययम् ! 
उर:स्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् !! ३१ !!

अर्थ - यानं थोडक्यात पण अगदी स्पष्टपणं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. ते समजण्यास नि:संदिग्ध होतं. थांबुन थांबुन किंवा शब्द आणि अक्षरे तोडून कुठलंही वाक्य त्यानं उच्चारलं नाही. कुठलंही वाक्य कर्णकटु वाटलं नाही. त्याची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने स्थिर झाली आहे आणि कंठातून वैखरी रुपाने प्रकट झाली आहे !

संस्कारक्रमसम्पन्नामद्भुतामविलम्बिताम् !
उच्चारयति कल्याणी वाचं ह्रदयहर्षिणीम् !! ३२ !!

अर्थ - बोलताना याचा आवाज फार बारीकही येत नाही नि फार वरही जात नाही. मध्यम आवाजात त्यानं सर्व काही सांगितलं आहे !

अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यंजनस्थया ! 
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि !! ३३ !!

अर्थ - ह्रदय कंठ आणि मुर्धा ह्या या तीन स्थानांकडून स्पष्ट रुपानं अभिव्यक्त होणारी ह्याची ही चित्रवतवाणी ऐकुन कुणाचं चित्त प्रसन्न होणार नाही. वध करण्या साठी म्हणून तलवार उचललेल्या शत्रुचं ह्रदय देखील ह्या वाणीनं बदलु शकेल !

एवंविधो यस्य दुतो न भवेत् पार्थिवस्य तु ! 
सिद्ध्यन्ति हि कथं तस्य कार्याणां गतयोsनघ !! ३४ !! 

अर्थ - हे निष्पाप लक्ष्मणा, ज्या राजांपाशी ह्यासारखे दुत नसतील, त्यांची कार्य सिद्धी कशी होउ शकेल बरे??? 

किष्किंधा कांड - वाल्मिकी रामायण - सर्ग तीन -  श्लोक संख्या २८ ते ३४

प्रत्यक्ष श्रीरामचंद्राच्या तोंडुन पहिल्याच भेटीत हनुमंताबद्दलचं हे चिंतन ऐकल्यावर हनुमंताचं व्यक्तिमत्व किती विलक्षण प्रभावशाली असेल ह्याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. पहिल्याच भेटीत श्रीरामचंद्र हे बोलतात ! काय आश्चर्य आहे ! 

बुद्धिमतां वरिष्ठं अशा हनुमंतांनी सर्व वेदांचा सुक्ष्म रीतीने अभ्यास केला होता नि त्यांचं आचरण पण तसंच होतं. व्याकरणाचा पण त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे वानर देखील त्यावेळी वेदांचा अभ्यास करत होते. मग तथाकथित स्त्री-क्षुद्रांना नि तथाकथित बहुजन समाजाला वेद नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे??? किती दिवस आम्ही हा खोटी धारणा बाळगणार आहोत की हिंदु धर्मात वेदांचा अभ्यास फक्त विशिष्ट जातींपुरता होता नि आहे म्हणून???

रामचंद्रांचा देखील वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास होता नि ते देखील त्यात पारंगत असुन रत्नपारखी होते हे किती विलक्षण आहे. असो ! पुढे श्रीरामचंद्र म्हणतात की हनुमंत हे बोलताना कुठेही तुटकतुटक किंवा असंबद्ध किंवा अशुद्ध बोलत नाहीत. चेहरा किंवा अंगप्रत्यंगावरचे हावभाव किंवा हालचाल देखील किती आदर्श नि आचरणीय आहे.

हनुमंताची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने नि कंठात वैखरी रुपाने स्थिर आहे कारण योगशास्त्रानुसार वाणीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मध्यमा, वैखरी, परा नि पश्यंती असे प्रकार आहेत. त्यातही हनुमंत हे पारंगत आहेत हे सिद्ध होतं. कारण त्यांचा आवाजही फार वर किंवा खाली नसुन मध्यम होता. त्यामुळे श्रीरामचंद्र म्हणतात की ह्याची वाणी ऐकुन एखादा शस्त्रधारी देखील आपलं शस्त्र खाली ठेवेल. इतकी विलक्षण सुंदर नि कर्णमधुर वाणी हनुमंतांची आहे. असा मंत्री ज्याच्या जवळ असेल त्याची कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहील का??? 

व्यक्तिमत्वाचं ह्यापेक्षा उत्तम उदाहरण शोधायची आवश्यकता आहे का ??? वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास जर वानर देखील करत असतील तर आम्हा मनुष्यांना तो आज का एवढा अस्पृश्य झालाय??? किती करंटे आहोत आम्ही भारतीय??? दुर्दैवी ते आणखी कोण??? 

रामायणात इतर ठिकाणचे वर्णन

मुळ वाल्मीकी रामायणात हनुमंताचे जे वर्णन आले आहे ते वाचले की मन अक्षरश: थक्क होते. ते बुद्धिमतां वरिष्ठं तर आहेतच पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा प्रखर इंद्रियसंयम म्हणजे कडकडीत असं आजीवन अखंड ब्रम्हचर्य ! 
ब्रम्हचर्याचं सामर्थ्य हे हनुमंताशिवाय अन्यत्र कुठेच फारसं प्रकट झालेलं नाही. महाभारतातल्या भीष्माचार्यांचं उदाहरण तसं जरी असलं तरीही हनुमंतांचं उदाहरण हे विलक्षण प्रेरणादायी आहे. समर्थ देखील म्हणतात की

मुखी राम त्या काम बाधु शकेना ! 
गुणे इष्ट धारिष्ट्य त्या हे चुकेना ! 
महाभक्त शक्त कामास मारी ! 
जगीं धन्य तो मारुती ब्रम्हचारी !

महर्षी वाल्मिकी स्पष्ट म्हणतात की 

न भुमौ नान्तरिक्षे वा ना नाम्बरे नामरालये ! नाप्सु वा गतिसंगं ते पश्यामि हरीपुंगव: ! 

"मारुतीसारखा कुणी जलचरात नाही, भूमीवर नाही, अंतरिक्षात नाही, अंबरात नाही, स्वर्गा नाही !" 


सुग्रीव सीताशोधाच्यावेळी हनुमंतांना उद्देशुन म्हणतो की

"हे हनुमंता, तुला असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, राजे लोकांचं ज्ञान आहे. लोकपालांसह चौदा भुवने, एकवीस स्वर्गांचे तुला ज्ञान आहे. सागरांसह पर्वताचं तुला ज्ञान आहे. हे मारुती तुझी अकुंठीत गती, तुझा वेग, तेज व स्फुर्ती हे सर्व सद्गुण तुझ्यात परिपुर्ण आहेत. या भुमंडलात तुझ्या सारखा तेजस्वी दुसरा कुणीही नाही."

हनुमंत हे आजीवन अखंड ब्रम्हचारीच ! 

ब्रम्हचर्याचे दोन प्रकार आहेत. एक नैष्ठिक (उपकुर्वाण) ब्रम्हचर्य नि दुसरे गार्हस्थ्य ब्रम्हचर्य ! विवाह करुन देखील केवळ स्वस्त्रीशी तेदेखील शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संसार करणे देखील गार्हस्थ्य ब्रम्हचर्याचे उदाहरण आहे आजीवन अखंड ब्रम्हचारी भीष्माचार्यांनी महाभारतात धर्मराज युधिष्ठिराला उपदेश करताना गार्हस्थ्य ब्रम्हचर्याची व्याख्या सांगितली आहे. असो ! याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये ब्रम्हचर्याची व्याख्या अशी केली आहे की

कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा !
सर्वत्र मैथुनत्यागौ ब्रम्हचर्यं प्रचक्षते ! 

अंत्यबिंदु निषेकस्तु मैथुनम् !

अथर्वेवेद पण स्पष्ट सांगतो की

ब्रम्हचर्येण तपसा देवा मृत्युमुपाघ्नत ! 
इन्द्रौ हि ब्रम्हचर्येण देवेभ्य: स्वराभरत !
(अथर्ववेद)
(ब्रम्हचर्याच्या जोरावरच देवतांनी मृत्युवर विजय मिळवला. इंद्राने देखील ब्रम्हचर्यानेच देवांचं राजपद मिळवलं)

भगवान शंकर देखील म्हणतात

सिद्धे बिन्दौ महादेवि किं न सिद्ध्यति भूतले ! 
यस्य प्रसादान्महिमा ममाप्येतादृशौ भवेत् !
न तपस्तप इत्याहुर्ब्रम्हचर्यं तपोत्तमम् ! 
उर्ध्वरेता भवेद्यस्तु स देवो न तु मानुष: ! 


ब्रम्हचर्यांचा महिमा यापेक्षा आणखी गायची आवश्यकता आहे काय? हनुमंत हे तर ब्रम्हचर्याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. कारण रामायणात स्पष्ट उल्लेख आहे की हनुमंत हे जन्मत:च कांसोटा घेउन जन्माला आले होते. ज्ञानोबाराय म्हणतात

कर्मे हनुमंत उदरी कांसोटा ! कर्मे शुकदेव गर्भिकष्टा ! 

तर अशा ह्या नरश्रेष्ठांस कोटी कोटी प्रणाम !!!

महाबली, अतुपराक्रमी पवनसुत अंजनेय श्रीरामदुत हनुमान की जय ! सियांवर श्रीरामचंद्र की जय !! हिंदुधर्मकी जय !!! हिॅदुराष्ट्रकी जय !!! 


तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३

Tuesday, March 17, 2015

स्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन – हिंदू धर्माची अधिकृत सनदच घेतली ! आनंदी आनंद !!!

स्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन – हिंदू धर्माची अधिकृत सनदच घेतली ! आनंदी आनंद !

(Complete Works of Swami Vivekananda - The Charter of Hindu Faith by Bhagini Nivedita )



काल पापमोचनी एकादशी ! माझ्या जीवनातला एक आनंदाचा दिवस ! डेक्कनच्या संभाजी पुलांवर मला स्वामीजींचे दहा खंड जे ग्रंथावली नावाने परिचित आहेत ते प्राप्त झाले. गेल्या आठ वर्षाची इच्छा काल पूर्ण झाली. मी खरच परमभाग्यवान ! हो कारण...



स्वामीजींचे माझ्या जीवनातले आगमन 

मला चांगले आठवते. इयत्ता ८वी, २००१ चे वर्ष ! आमच्या पंढरीतल्या कवठेकर प्रशालेत मी प्रवेश घेतला होता आणि त्याच वर्षी शहरात विवेकानंदांवर एक परीक्षा घेण्यात आली होती. “स्वामी विवेकानंद संक्षिप्त चरित्र आणि उपदेश” या रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या छोटेखानी चरित्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती ज्यासाठी माझ्या वर्गातले आम्ही काहीच जण उपस्थित होतो. माझा एक परममित्र वेदमुर्ती  विवेक कुलकर्णी हादेखील होता. रविवारी ही परीक्षा झाली होती सकाळी १०.०० ते १.०० ह्या वेळेत दीर्घोत्तरी प्रश्नांची. आम्ही थोडे उशिरा पोहोचलो. दुर्दैवाने मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही पण स्वामीजींचे ते चरित्र मात्र माझ्या हृदयपटलावर नि जीवनावर कायमचे कोरले गेले. खरंतर आयुष्यातले मी वाचलेले ते पहिलेच पुस्तक ! पहिल्याच पानावर ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंसाच्या निर्विकल्प समाधी अवस्थेचा प्रसंग आणि सप्तर्षी मंडळातला त्यांचा सुक्ष्म देहाचा प्रवास नि त्यातल्या एका सप्तर्षीला जागे करणारे छोटे बालक म्हणजे ठाकूर स्वतः आणि ते सप्तर्षी म्हणजे स्वतः स्वामीजी ! मला आजही रोमांचित करणारा हा प्रसंग आहे.



पुढे काही वर्षानंतर...

स्वामीजींचे साहित्याचा परिचय मात्र पुढे झाला. माझा एक परममित्र चिदानंद सर्वागोड ह्याने मला स्वामीजींची राजयोग, ज्ञानयोग आणि ठाकुरांचे चरित्र आणि उपदेश हे तीन ग्रंथ ९ वी मध्ये असताना वाचायला दिली. श्रीरामकृष्णांच्या त्या चरित्राने तर मी आल्हादितच झालो. हिंदुस्थानची मागच्या दोन सहस्त्र वर्षांची अध्यात्मिक साधना ज्या एका महापुरुषामध्ये घनीभूत होऊन अवतरली होती असे ठाकुरजी हे ूा चरित्रकार रोमा रोलांचे उद्गार मला नंतर खर्या अर्थाने पटले.  खरंतर तेवढ्या नकळत्या वयात ज्ञानयोग समजणे अशक्यच होते म्हणून मी राजयोगच झपाट्याने वाचून काढला. कारण गूढ नि रहस्यमय विषयांची आवड माणसाला कधीकधी अवघड साहित्याचेही वाचन करायला भाग पाडते. विशेषरूपाने मला राजयोगाने भुरळ घातली. भले तो समजण्यास नि आचरण्यास कठीण असला तरी मला तो फार भावला. अजूनही ति मोहिनी कायम आहे. का कुणास ठाऊक !



अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतरी झाकोनि असावे ! प्रकटोनि नासावे,  हे बरे नव्हे !

समर्थांच्या ह्या उक्तीप्रमाणे स्वामीजींचे पहिले तीन खंड पूर्ण वाचूनच व्याख्यान देण्याचा निश्चय केला. १२ जानेवारी, २०१४ ह्या दिवशी पंढरीत स्वामीजींच्या १५१व्या जयंतीनिमित्त माझे पहिले प्रकट व्याख्यान झाले. त्यासाठी “विवेकानंदांचा विश्वदिग्विजय” हा विषय मी निवडला होता आणि म्हणूनच केवळ ग्रंथावलीवर अवलंबून न राहता मेरी लुईस बर्क या पाश्चिमात्य विदुषीने स्वामीजींच्या जीवनावर प्रकाशित केलेलं संशोधनपर असे साहित्य वाचले. Swami Vivekananda In America – New Discoveries  ह्या नावाने त्यांनी लिहिलेला आंग्लभाषेतला खंड वाचून काढला. आणि मगच व्याख्यान दिले. तो दिवसच वेगळा होता माझ्यासाठी ! असो !

खरंतर स्वामीजींचे साहित्य म्हणजे हिंदू धर्माची अधिकृत सनदच आहे. हे ग्रंथ घेतल्यावर माझ्या मनातले भाव मी फक्त खालील वचनात प्रकट करू शकतो. कैवल्यसम्राट संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतामुळे ज्या रामेश्वर शास्त्रींना जगद्गुरू तुकोबारायांची योग्यता समजून आली, अंगाची लाहीलाही होताच तुकोबांच्या हस्तस्पर्शाने ज्यांच्या सर्वांगाचा दाह शांत झाला, त्या रामेश्वर शास्त्रींनी जे चार अभंग तुकोबारायांसाठी म्हंटले त्यातल्या पहिल्याच अभंगात थोडा बदल करून, त्यांची क्षमा मागून मी म्हणतो

माझी मज आली रोकडी प्रचीती !

पाहुनी ग्रंथावली हर्ष पावें !

स्वामी सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हां थोर !

कां जे अवतार नरनारायणाचा !




ग्रंथावली निर्मिती आणि प्रसार 

स्वामीजींच्या प्रमुख शिष्या कर्मयोगिनी नि समर्पिता, ज्यांचे वर्णन स्वतः स्वामीजींनी “द रिअल लायनेस”, महायोगी अरविंदांनी “अग्निशिखा’ आणि रवींद्रनाथांनी “लोकमाता’ असे केले होते, अशा भगिनी निवेदितांनीच हे समग्र साहित्य संकलित करून छापले. प्रथम चार खंडात छापले गेलेले हे साहित्य नंतर आज दहा खंडात विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. ह्याचे श्रेय आणखी एका व्यक्तीला दिले गेले पाहिजे आणि ती म्हणजे स्वामीजींची विदेशातली व्याख्याने टिपून घेणाऱ्या लेखिका श्रीमती गुडविन बाईसाहेब ह्या होत. खरंतर त्यांचे अनंत उपकार म्हणूनच हे साहित्य आज आपणाला मिळते आहे. कारण त्याकाळी ध्वनिमुद्रण करणारी उपकरणे नसल्याने लघुटंक लेखनाच्या सहाय्याने (short-writting) हे साहित्य ग्रथित केले गेले. खरंतर हे साहित्य म्हणजे समग्र भारताचा आत्माच नि चिरंतन असा शाश्वत झरा आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी एक आठवण ह्या बाबतीत सांगितली आहे की त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात प्राचार्य सोनोमामा दांडेकरांसारख्या लोकोत्तर विद्वानाने देखील त्यांना निक्षून सांगितले होते की तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर विवेकानंदांची समग्र ग्रंथावली ही प्रस्तावना म्हणून तरी वाचा ! फक्त प्रस्तावना म्हणून !!!  ह्यापेक्षा आणखी मोठेपण सांगायचे काय राहिले आहे ??? प्रत्येकाने हे अजरामर साहित्य वाचावे ही नम्रतेची विनंती ! सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यातल्या रामकृष्ण मठाने ह्यातले बरेच साहित्य ध्वनिमुद्रण स्वरुपात प्रकाशित केलय आणि करताहेत. सर्वांनी ते अवश्य घ्यावे आणि ऐकावे ! गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांनी म्हटल्याप्रमाणे जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा ! शेवट भगिनी निवेदितांच्याच शब्दात लेखणीला विराम देतो.



“स्वामी विवेकानंदांच्या वाणींतून आणि लेखणींतून निर्माण झालेल्या साहित्याद्वारा एकीकडे जसा समग्र जगताला अमर ज्ञानज्योतीचा परममंगल लाभ झाला, तशीच दुसरीकडे हिंदू संतानांना स्वतःच्या धर्माची अधिकृत सनद (The Charter of Hindu Faith) प्राप्त झाली. स्वतःच्या धर्मासंबंधी आपण बाळगत असलेल्या आपल्या धारणा बरोबर आहेत किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी हिंदू माणूस आणि स्वतःच्या मुलाबाळांना त्यांच्या पूर्वजांचा धर्म काय होता हे शिकवू इच्छिणारी हिंदू आई ही प्रत्ययोत्पादक आणि विश्वसनीय ज्ञानासाठी यापुढे कित्येक युगे ह्याच ग्रंथांच्या पानांकडे वळतील. भारतातून इंग्रजी भाषेचा लोप झाल्यानंतरही, त्या भाषेतून अवघ्या जगाला प्रदान केले हे पसायदान चिरकाल तसेच अक्षुण्ण राहून प्राच्य आणि पाश्च्यात्त्य देशांमध्ये सारखेच फलद्रूप होत राहील. हिंदू धर्माला जर कशाची आवश्यकता होती तर ती म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा साठा एकत्रित आणि सुसंघटित करण्याची. जगाला आवश्यकता होती – जिला सत्याचे भय नाही अशा एका धर्मश्रद्धेची. स्वामी विवेकानंदांच्या संदेशाने ही दोन्ही कार्ये साधली आहेत.”  

श्रीरामकृष्ण-विवेकानंद पदाश्रित - निवेदिता – ४ जुलै, १९०७



तुकाराम चिंचणीकर – ८८८८८३८८६३


Thursday, February 26, 2015

छत्रपती शिवराय नि स्वातंत्र्यवीर सावरकर



एतद्देशप्रसुतस्य सकाशात् अग्रजन्मन: !
स्वंस्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवा: !! - मनुस्मृती !
"ह्या राष्ट्रात जन्मलेल्या श्रेष्ठ पुरुषांनी ठिकठिकाणी जाउन आपापल्या चरित्राने ह्या पृथ्वीवरच्या सर्व मानवजातीला सुशिक्षित नि सुसंस्कृत करावं ( आर्य करावं )"
हिंदुस्थानच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्वे जन्माला आली की ज्यांचे मुल्यमापन कालाच्या सीमारेषेत येऊ शकत नाही. विभूतिमत्वाचे स्मरण कोणत्याही काळी व कोणत्याही परिस्थितीत दीपस्तंभाप्रमाणे समाजजीवनाचे मार्गदर्शन करतच असते. श्रीशिवराय हे अशाच प्रतिभेचे धनी आहेत. भगवद्गीतेमध्ये धनंजयाने पुर्ण पुरुषोत्तमाला स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारताना म्हणलंय
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव !
स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ! (२.५४)
त्यावेळी भगवानांनी जे उत्तर दिलंय ते असंय
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् !
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते !! (२.५५)
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश: !
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता !! (२.६८)

स्थितप्रज्ञ म्हणजे "यस्य प्रज्ञा स्थिरा अस्ति" म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा तो ! पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर हीच स्थितप्रज्ञाचा आपणांस दिसून येते. ह्याला प्रमाणच द्यायचं झालं तर समर्थांच्या परमप्रतापी शंभुराजेंना लिहिलेल्या पत्रात आपणांस मिळेल. ते म्हणतात
शिवारायांचे आठवावे रुप ! शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवरायांचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी !
शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे !
शिवरायांची सलगी देणे, कैसी असे !
सकल सुखाचा केला त्याग ! करूनि साधिजे तो योग !
राज्यसाधनेची लगबग, कैसी केली !
ह्यापेक्षा आणखी स्वच्छ नि स्पष्ट पुराव्याची आवश्यकता हवीय काय?



स्थितप्रज्ञ सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं तरीही आपल्याला स्थितप्रज्ञतेचे अलौकिक दर्शन घडतं. मी ह्या दोन राष्ट्रपुरुषांची तुलना अजिबात करत नाहीये. तेवढी माझी योग्यताही नाही नि इच्छाही नाही. कारण ही दोन्हीही माझी लाडकी व्यक्तिमत्वं तर आहेतच पण त्याहीपेक्षा ती दोन्ही सकल हिंदुराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. मला व्यक्तिश: असं वाटतं की शिवरायांची तुलना ही फक्त फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाशी होऊ शकते, अन्य कुणाशीही नाही. तरीही आज सावरकरांचा आत्मार्पण दिन असल्याने हा लेखन प्रपंच गोड मानवून घ्यावा ही विनंती !
सावरकर हे स्थितप्रज्ञच होते हे नि:संशय सत्य आहे.

माझा कान पकडण्याचा अधिकार फक्त शिवरायांनाच आहे - शिवभक्त सावरकर
सावरकर हे लहानपणापासूनच प्रखर शिवभक्त होते. म्हणून तर अगदी कोवळ्या वयाच्या सावरकरांनी अवघ्या सतराव्या वर्षी शिवगीत रचले नि पुढे जाउन शिवप्रभूंची अतिप्रसिद्ध आरती पुण्यात रचली नि सानंद सवंगड्यांसह गायली. फर्ग्युसन महाविद्यालयात आर्यन संघ नावाच्या चोथ्या भोजनासंघाच्या वेळी दर आठवड्याला म्हणायसाठी रचली. वय वर्ष अवघं १९ ! काय म्हणावं ह्या प्रतिभेला??? पुढे जाउन हेच सावरकर बाजीप्रभूंचा पोवाडा लिहताना म्हणतात
तुज भगवान् श्रीशिवराजा
स्वातंत्र्यप्राप्तिच्या काजा
बोलावी तिकडे जा जा
देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला
चला घालुं स्वातंत्र्य-संगरी रिपूवरी घाला !
मद्देशनि माझा राजा
तो प्राण देव तो माझा
मी शरण शिवा सांगा जा !
वसुदेव तूंच शिवराया ! कंसकपटा या ! करूनिया वांया !
स्वातंत्र्य कृष्ण-चिन्मुर्ती !
जा घेउनि आपुल्या हांती !
गडगोकुळांत नांदो ती !
(नाशिक - १९०६)
ही झाली काव्यरचना ! सावरकरांच्या लेखातून तर त्यांची शिवभक्ती प्रत्यही क्षणोक्षणी दिसून येते. छत्रपती शिवराय जर आज जन्माला आले असते तर ते काय बोलले असते हे पाहून सावरकरांनी जो लेख लिहलाय तो वाचला की त्यांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब पहायला मिळतं. सावरकरांचे हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे गीत तर त्यांच्या अत्युत्कट शिवप्रेमाचं द्योतक आहेच.

सावकरांचं हिंदुसमाज संघटन
खरंचर हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे तरीही थोडक्यात सावरकरांच्या ह्या गुणवैभवाचं प्रत्यंतर घेउयात. छत्रपतींनी अठरा पगड ज्ञातींची मोट बांधून हिंदवी स्वराज्य उभारलं. सावरकरांनी पण शिवरायांच्या ह्याच सिद्धांताचं अनुकरण करून हिंदु संघटनाचं अलौकिक नि व्यवहार्य कार्य यशस्वीरीत्या करून दाखवलं. सावरकरांचं संघठन कौशल्य हे इतकं अफाट होतं की अभिनव भारत ह्या संस्थेचा विस्तार हा बृहन्महाराष्ट्रातल्या नाक्यानाक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्रात झालेला होता असं डाॅ. वि. म. भट ह्यांच्या अभिनव भारत ह्या ग्रंथात उल्लेखलं गेलं आहे. पुंढे लंडनमध्ये गेल्यावर तर हे क्रांति-संघटनाचं कार्य अतिशय कठीण होतं कारण तिथे सर्व भिन्नप्रकृतीची लोकं होती. या सर्वांना एका सूत्रांत बांधून त्यांना कार्यप्रवण ठेवणं ही सोपी गोष्ट नव्हतीं मग तो मदनलाल धिंग्रा असो की लाला हरदयाळ असो की सेनापती बापट असोत. सावरकरांच्या त्यावेळीच्या कार्याचं कौतुक एक साम्यवादी नेते बॅ. अरुणा असफअली ह्यांनी करताना म्हटलं होतं की," सावरकर हे प्रतिशिवाजीच होतं ! "
खरंतर एका साम्यवाद्याने अशी उपमा देणं हे चिंतनीयच आहे. शिवरायांचे प्रत्येक मावळे हे खरंतर प्रतिशिवाजीच होते इतकं तेज शिवरायांनी त्यांच्यामध्ये संक्रमित केलं होतं. नेतोजी पालकर हे त्याचं सर्वात जळजळीत उदाहरण. सावरकरांबद्दल पुढे जाउन धर्मवीर डाॅ. मुंज्यांनी सुद्धा म्हटलं होतं की, " आम्ही सावरकरांना शिवरायांच्या खालोखाल मानतो! "

सावरकरांच शुद्धिकार्य
शिवरायांनी बजाजी निंबाळकरांना व नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेतलं होत ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे. इतकंच काय तर सक्तीनं धर्मांतर करणार्या चार ख्रिश्चन पाद्र्यांना म्हणजे धर्मप्रसारकांना पण त्यांनी न ऐकल्यामुळं त्यांना हिंदु करून घेतलं होतं. हे असे पुरावे असताना शिवरायांवर सेक्युलरचेचा बुरखा चढवायचा प्रयत्न करणं म्हणजे द्वेषच आहे. असो. सावरकरांनी पण आजीवन शुद्धीचं जे कार्य केलं त्याचंही चिंतन प्रकट करणं आवश्यकच आहे. अंदमानातलं त्यांचं कार्य तर अलौकिक आहे. अंजमानाच्या त्या भयाण अंधेरीत देह पिचत असतानाही सावरकर हे तिथल्या बंदीवानांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदुंना स्वधर्मात परत घेत. माझी जन्मठेप ज्यांनी वाचलं असेल त्यांना हे माहिती असेल. हे कार्य सतत सुरु होतं. स्थानबद्धतेतही सावरकर गप्प बसले नव्हते. पुढे २१ आॅगस्ट १९५५ सालची गोष्ट. मुंबईत चाळीस कोळी बांधवांचा शुद्धी समारंभ करताना सावरकर म्हणाले होते की, " हे शुद्धी कार्य इतके महत्वाचे आहे की त्यासाठी मला पुनर्जन्म यावा." अध्यक्ष होते जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य ! दार-उल्-इस्लाम नि दार-उल्-हरब ह्या दोन गोष्टींवर तर ते नेहमी भर देत. महामानव डाॅ. आंबेडकरांनी पण हेच ठासून सांगितलं होतं त्यांच्या पाकिस्तान ह्या ग्रंथात. जिज्ञासुंनी ते वाचावं.गांधीजींचं मुस्लीम नि ख्रिश्चन धार्जिणं धोरण नि काँग्रेसचा पाठिंबा नि हिंदुंची स्वाभिमानशून्यता सावरकरांना अस्वस्थ करत होती तरीही सावरकर त्यांचं कार्य नेटाने पुढे चालवत होते. स्थानबद्धतेत तर ते देवल स्मृती नि अत्रि स्मृतीचा दाखला देउन शुद्धीकार्य किती आवश्यक आहे हे विरोधकांना साधार पटवून देत. स्वधर्म प्रचाराचा अधिकार जसा अ-हिंदुंना आहे तसा तो हिंदुंनाही असलाच पाहिजे, असं ते निक्षून सांगत.

विज्ञाननिष्ठ सावरकर
राजाराम महाराज पालथे जन्माला आले म्हणून काही जणांना अपशकूनासारखी बाष्कळ चर्चा केल्यावर छत्रपती तर म्हणाले होते की हा राजाराम अख्खी पातशाही पालथी घालेल. सावरकरांनी शिवरायांचा हा गुण असाच अंगिकारला होता. विज्ञान हाच हिंदुच्या वर्तमानयुगाचा पाचवा वेद झाला पाहिजे असं ते आग्रहाने सांगत. हिंदुंनी विज्ञानाची कांस धरून नवनवीन यंत्रोद्योग उभारावेत नि औद्योगिक प्रगती करून हिंदुराष्ट्र बलशाली, वैभवशाली नि संपन्न बनवावे हीच त्यांची भूमिका होती. यंत्र हे मानवाला अतिमानुष करणारं वरदान आहे, शाप नव्हे, जे सृष्टिनियम प्रयोगान्ती सर्वथा अबाधित, शाश्वत आहेत असं विज्ञान शास्त्रानं सिद्ध झालं, तेच काय ते थरे सनातन धर्म हे त्यांचं विज्ञाननिष्ठ चिंतन होतं.

भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते शिवराय नि सावरकर
शिवछत्रपतींनी रघुनाथपंतांच्या सहाय्याने राज्यव्यवहारकोष निर्माण केला होता हे सर्वश्रुत आहे. शिवरायांनी मराठी भाषेत घुसडले गेलेल्या परभाषिक शब्दांची हकालपट्टी केली नि शुद्ध नि संस्कृतनिष्ठ शब्दांचा राज्यव्यवहारकोष तयार केला. हे भाषेवरचं प्रेम म्हणजे शिवरायांच्या अनेकविध अशा पैलुंपेकी एक महत्वाचे आहे. सावरकरांनीही भाषाशुद्धीची नि जागरणाची जी अलौकिक चळवळ केली ती पाहिली की मन थक्त होते. भाषाशुद्धीचे ते दोघेही कट्टर पुरस्कर्ते होते. सावरकरांनी तर इंग्रजी नि पाश्चिमात्य भाषेतल्या घुसलेल्या शब्दांना अनेक प्रतिशब्द निर्माण केले. खरंतर त्याची एक स्वतंत्र यादीच होत असल्यामुळे विस्तारभयास्तव इथे देत नाही. विरोधकांनी जेंव्हा आक्षेप घेतली की हे परकीय शब्द म्हणजे आम्ही आमच्या भाषेत पचवलेले आहेत नि ती आमची विजयचिन्हे आहेत तेंव्हा त्यांच्या ह्या स्वाभिमानशुन्यतेला नि सद्गुणविकृतेला सावरकर उत्तर देताना सावरकर म्हणाले की, "चुकताय आपण. ती काही आमची विजय चिन्हं नव्हेत तर ती आमच्या भाषेच्या अंगावरील व्रण आहेत, व्रण !"
आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे ! तिला अव्हेरुन इंग्रजी, फारशी इत्यादि परक्या भाषांतून शब्द घेणं म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकुन देऊन, चिनी मातीची कप भांडे हाती घेण्यासारखे आहे ! अशी बहुमोल खाण घरी असताना परक्यांच्या दारी भीक कां मागता???"
आजही आपण बघा की जर शुद्ध नि संस्कृत निष्ठ बोलायला गेले की लोक लगेचच तोंडाकडे बघतात. जणु काही आपण काही अपराधच करताहोत? कधी सुधारणार आहोत आम्ही हिंदु??

कुशल नि कर्तव्यनिष्ठ राजकारणधुरंधर शिवराय

भगवान श्रीकृष्णानंतर शिवरायांसारखा कुशल, धुर्त, मुत्सद्दी नि ध्येयधोरणी राजकारणधुरंधर नेता कुठेच पहायला मिळणार नाही आणि भविष्यात होणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. समग्र शिवचरित्र हे अशा अनेक उदाहरणांना भरलेलं असल्याने मी जास्ती लिहायची आवश्यकता नाहीच. सावरकरांच्या जीवनातही सावरकरांनी हेच राष्ट्रनिष्ठ नि धर्मनिष्ठ राजकारण केलं. १९३९ च्या महायुद्धात ब्रिटन गुंतलेलं असताना आम्ही ह्या अडचणीच्या कालीवधीत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न काढू इच्छित नाही असं गांधीजी नि नेहरु म्हणाले होते. (धनंजय कीरांनी लिहिलेलं गांधींजींचं चरित्र). पण राजकारणधुरंधर सावरकर मात्र "शत्रुची अडचण तो आपला सुवर्णक्षण" ह्या न्यायाने हिंदुस्थानला स्वातंत्र्यप्राप्तीची व्हावी ही संधी साधु इच्छित होते. पुढे महायुद्धात मित्र राष्ट्रांनी जेंव्हा अटलांटिक सनदेची घोषणा केली तेंव्हा ती केवळ स्वार्थासाठी आहे असं ओळखून तिचा धिक्कार करणारे सावरकर एकमेव होते. रुझवेल्टला निरुत्तर करणारे सावरकरच होते. पुढे क्रिप्स नावाच्या धूर्त नि कावेबाज अशा ब्रिटीश मंत्र्याला निरुत्तर करणारे नि योजना झुळीस मिळवणारे सावरकरच होते. नेताजींना "शत्रुचा शत्रु आपला मित्र या नात्याने प्रेरणा देणारे सावरकरच होते. शिवरायांच्या जीवनात हीच नीती त्यांनी पिताश्रींची मुक्तता करण्यासाठी वापरल्याचे पुरावे सर्वश्रुत आहेत.

आस्तिक शिवराय नि सावरकर
शिवरायांना नास्तिक ठरवण्याचा प्रयत्नातं खंडण मी माझ्या १९ फेब्रुवारीच्या मागच्या एका लेखात केलंच आहे. शिवराय हे जसे आस्तिक होते तसे सावरकर हे देखील आस्तिक होते. सावरकरांना आजकाल नास्तिक काहीजण ठरवण्याचा प्रयत्न करताहेत. पण सावरकर हे आस्तिकच होते याचे अनेक पुरावे त्यांच्या वांग्मयात वेळोवेळी पहायला मिळतात. एखादा लेख वाचून जर आपण त्यांना नास्तिक म्हणायला लागलो तर तो घोर अन्याय ठरेल. समर्थांच्या भाषेत ते पढतमूर्खाचं लक्षण ठरेल.
समूळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाच ठेवी जो दुषण !
गुण सांगता अवगुण, पाहें तो एक पढतमुर्ख !
दासबोध - दशक दोन समास दहा !
असो ! मी पुन्हा एकदा सांगतो की या लेखाचा उद्देश्य ह्या दोन राष्ट्रपुरुषांची तुलना करणे अजिबात नसून ह्यातून सावरकर हे कसे शिवरायांचे कट्टर अनुयायी होते हेच सिद्ध करण्याचा आहे. खरंतर हे शिवधनुष्य पेलण्यासारखंय पण मी एक छोटासा प्रयत्न केलाय. शेवट सावरकरांच्याच वाणीने करतो<

.....की हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
" जेव्हा श्रीराम आपले पित्याचे वचनासाठी वरवर, परंतु राक्षसक्षयासाठी मुख्यत: राज्य सोडून वनवासात शिरले तेव्हा त्यांचे ते कृत्य महत् होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली व अपरिहार्य व धर्मयुद्धाला सज्ज होवून रावणाला ठार मारले तेव्हा ते कृत्य महत्तर होते. परंतु जेव्हा शुद्धीनंतरही सीतेला उपवनात 'आराधनाय लोकस्य मुय्चतो नास्ति मे व्यथा' म्हणून सोडून दिली तेव्हा त्यांचे ते अवतारकृत्य महत्तम होते !!! रामाचे व्यक्तिविषयक वा कुलविषयक कर्तव्य त्यांनी त्यांच्या लोकनायकाच्या राजाच्या कर्तव्यासाठी बळी दिले ! रामाचे अवतारकृत्य व श्रीरामचंद्रांची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत, हिंदूंनो, तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारूतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहन्ता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे तो पर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहजलब्ध राहणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला."

हिॅदुह्रदयसम्राट, हिंदुत्वाचे अग्रणी, हिंदुधर्माचे नुतन शुक्राचार्य, वैनतेय स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचा विजय असो !!!
जय भवानी ! जय शिवाजी !! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!

तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३

Wednesday, December 10, 2014

सावरकरांचं सागरसूक्त - ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !



सावरकरांचं सागरसूक्त - ने मजसी ने परत मातृभूमीला !
आज १० डिसेंबर ! १०५ वर्षांपूर्वी म्हणजे १० डिसेंबर, १९०९ साली हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनार्यावर ने मजसी ने परत मातृभूमीला ह्या कवितेची रचना केली. मातृभूच्या विरहार्थ रचलेल्या ह्या अद्वितीय काव्याचं चिंतन हे सावरकरांच्या अत्युत्कट नि प्रखर राष्ट्रभक्तीचं द्योतक आहे ! हिंदुस्थानच्या इतिहासात एवढ्या अलौकिक मातृभूच्या विरहाचं यथार्थ चित्रण अन्यत्र क्वचितच सापडेल ! क्रांतिकारकांचे मुकुटमणी असलेल्या सावरकरांच्या नवनवोन्मेषशालिनी अशा प्रतिभेला फुटलेले हे धुमारे हे सावरकरांच्या प्रतिभासंपन्नतेचे जसे चित्रण करतात, तद्वतच त्यांच्या प्रखर राष्ट्राभिमान नि दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रतीक आहेतच ! ज्या सावरकरांनी पुढे जाऊन अंदमानच्या भयाण अंधेरीत लेखन साहित्य न मिळाले तरीही केवळ खिळ्यांच्या सहाय्याने दहा सहस्त्र आेळींचं महाकाव्य लिहून काढलं, त्या तात्याराव सावरकरांचं हे सागरसूक्त प्रत्येकाच्या चिंतनाचा विषय आहे !
पार्श्वभूमी
अभिनव भारत ह्या आपल्या क्रांतिकारक संघटनेवर ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांची झालेली पकडापकड नि अनन्वित अत्याचार, स्वतःच्या बंधुंची झालेली अटक ह्या सर्व पार्श्वभूमीवर हा द्रष्टा महामानव नक्कीच गहिवरला ! भविष्यात आपणांसही अटक होणार नि आपल्या हातून घडणारे ह्या राष्ट्रकार्याला विराम मिळणार ह्या भावनेने तात्याराव अस्वस्थ झाले. त्यांच्याच शब्दांत सांगितलं तर...
कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेने !
लब्धप्रकाश अितिहास-निसर्गमानें !
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे !
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे !!
हे सतीचं वाण धरल्याने जे काही दिव्य नि दाहक परिणाम भोगायचे ते भोगण्यास ते सिद्ध होतेच, त्यात शंकाच नाही ! पण त्यांची अवस्था अशी होती की लंडनच्या वास्तव्यात त्यांना नि त्यांच्या सहकारयांच्या धरपकडीने ते मातृभूच्या विरहाने अतिशय व्याकुळ झाले होते ! तेंव्हा लंडनपासून ५० मैल दूर असलेल्या ब्रायटनच्या किनार्यावर त्यांना ह्या वेदना असह्य झाल्यावर त्यांच्यातल्या प्रतिभासंपन्न कवीने हे काव्य रचले ! त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे मित्र निरंजन पाल हेदेखील होते!


रसग्रहण
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणिन ॥
विश्वसलो या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
ह्याच सागराला पलाय प्राणप्रिया भारतमातेच्या चरणतलाला धुताना सावरकरांनी पहिले होते. मला तू म्हणालास की आपण परदेशी जाऊ आणि सृष्टीची विविधता पाहू म्हणून. त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली. पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन. लवकरच परत येऊ या तुझ्या वाचनावर मी विश्वास ठेवला आणि फसलो म्हणजे “बनलो.”

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तशी माझी फसगत झाली आहे.
हा भूमातेचा विरह मी कसा सहन करू ? माझ्या पुढच्या दिशा तमोमय म्हणजे अंधःकारमय झाल्या आहेत. त्या भारतमातेने सुगंध घ्यावा म्हणूनच मी हि गुणसुमने वेचली. पण जर माझ्या विद्येच्या विनियोग जर ह्या मातेच्या उद्धारासाठी होत नसेल तर तिचा भार मजला व्यर्थ आहे. ति आम्रवृक्षवत्सलता, त्या नवीन फुलांच्यावेली नि तो बाल गुलाब हे दोन्हीही आज मला पारखे झाले आहेत. म्हणून माझा प्राण तळमळतो आहे कारण त्या फुलबागेची सर ह्या इथल्या फुलबागेला कशी येणार ??

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

नभामध्ये नक्षत्र अनेक असतील पण मला माझा भारतमातेचाताराच अतिशय प्रिया आहे. इथे अनेक भव्य नि दिव्य प्रासाद म्हणजे महाल असतीलही पण मला माझी आईची झोपडीच खूप प्रिय आहे. तिच्याशिवाय मला राज्यही नको. मला तिचा वनीचा वनवासही प्रिय आहे. त्यामुळे आता मला हे भुलविणे व्यर्थ आहे. हे सरित्पते, तुझ्या लाडक्या सरितेची म्हणजे नदीची शपथ मी तुला घालतो आहे.

या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला !४!

या फेसंमधून असा निर्दयपणे हसतोयस का??? मला घाबरविण्यासाठी ???? का असा वाचन भंग करत आहेस? साम्प्रत्काली माझ्या भारतभूमीवर अधिराज्य गाजवत असणाऱ्या आंग्लभूमिला घाबरणार्या तू माझ्या मातेला अबला नको समजू ! नाहीतर मी हे त्या अगस्त्य मुनीला सांगेन, ज्याचा मी वंशज आहे ! ज्या अगस्त्याने एका आचमनात तुला प्राशन केले होते त्याचा मी त्याचा वंशज आहे हे विसरू नकोस !
ह्या शेवटच्या कडव्यात तर सावरकरांच्या विलक्षण अशा आत्माभिमानाचे नि आत्मगौरवाचे प्रत्यंतर आपल्याला येते. अगस्त्य मुनींचे दिलेले हे उदाहरणच प्रत्यक्ष प्रमाण आहे. सावरकरांच्या ह्या अद्वितीय प्रतिभेला विनम्र अभिवादन !!!

कवी कुसुमाग्रजांच्या वचनानेच शेवट करतो.
चिरंजीव ह्या हुतात्म्याचा विजयी अभिमान !
इतिहासाविण कुणी करावा ह्याचा सन्मान !!!

हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर कि जय ! छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!
हिंदुराष्ट्र कि जय !! हिंदू धर्म कि जय !!!
जय हिंदुराष्ट्र !!! जय मा भारती !!!

तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३